म. टा. प्रतिनिधी, सांगलीः कमी व्याजदरात पाच कोटी रुपयांचे कर्ज देण्याचेे आमिष दाखवून दोघांनी इस्लामपूर येथील एका डॉक्टरकडून प्रोसेसिंग फीसाठी ७ लाख ५० हजार रूपये उकळले. कर्ज मिळत नसल्याने प्रोसेसिंग फी ची रक्कम परत मागितल्यानंतर फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी डॉक्टरांनाच जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत डॉ. सचिन सांगरूळकर यांनी रविवारी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संदीप (पूर्ण नाव नाही) आणि अब्बास मुल्ला (रा. मायाक्का चिंचणी ता. रायबाग, राज्य कर्नाटक) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सचिन सांगरूळकर यांचे एस. टी. बसस्थानक परिसरात साई मल्टीस्पेशालिटी नावाचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये नवीन मशीन खरेदी व विस्तारीकरण करण्यासाठी डॉ. सांगरुळकर यांनी हॉस्पिटलमधील व्यवस्थापक राजेंद्र सत्रे यांना कर्जाची चौकशी करण्यासाठी सांगितले. सत्रे यांनी इंटरनेटवर माहिती घेतली. काही दिवसानंतर संदीप असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा सत्रे यांना फोन आला. तुम्हाला कर्जाची आवश्यकता असल्यास बालाजी फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळेल. काही कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे सांगत ती व्हॉटसअपवर पाठवण्यास सांगितले. २५ जून २०२० रोजी संदीपने सत्रे यांना पुन्हा फोन करून कागदपत्रांची तपासणी झाल्याचे सांगितले. पाच कोटी रूपयांचे कर्ज मंजूर झाले असून, यासाठी कागदपत्रांचे झेरॉक्स व दोन चेक द्यावे लागतील. झेरॉक्स आणि चेक कंपनीचे मायक्का चिंचणी येथील हाजीसाब अब्बास मुल्ला यांच्याकडे द्या, असे सांगितले. २७ जून रोजी राजेंद्र सत्रे व नैनिषा सांगरूळकर हे मायक्का चिंचणी येथे अब्बास मुल्ला यांच्या घरी गेले. मुल्लाने ५ कोटी कर्ज मंजूर झाले असून त्याची प्रोसेसिंग फी दीड टक्के प्रमाणे ७ लाख ५० हजार भरावे लागतील, असे सांगितले. २८ जून रोजी अब्बास मुल्ला हा इस्लामपूर येथे आला. सत्रे यांच्याकडून ७ लाख ५० हजार रूपये प्रोसिसिंग फी घेऊन गेला.

३० जून रोजी डॉ. सचिन सांगरूळकर आणि राजेंद्र सत्रे हे अब्बास मुल्ला याच्याकडे गेले असता, तुम्हाला कर्ज मिळणार नाही, तुमचे कर्ज नामंजूर झाल्याचे सांगत तुमची प्रोसिसिंग फी परत आणून देतो असे सांगितले. दरम्यान, ३ जुलै रोजी दुपारी अब्बास मुल्ला व इतर चार अनोळखी लोक सांगरूळकर यांच्या घरी आले. मुल्ला याच्याकडे ७ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. सचिन सांगरूळकर यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here