म. टा. प्रतिनिधी, नाशिक : चुंचाळे शिवारातील संजीवनगर परिसरात दोन तरुणांना शस्त्रासह लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चार संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गैरसमजुतीमुळे झालेल्या वादातून दोघांचा खून झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

संजीवनगरातल्या अशरफी चौकात झालेल्या खून प्रकरणी साहील हिरामण लिलके (वय १९) आणि वैभव उर्फ दादा कैलास धोंगडे (२४, रा. चुंचाळे) या दोघांसह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन गटांत गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास वाद झाले. टोळक्याच्या सशस्त्र हल्ल्यात मिराज खान (वय १९) आणि इब्राहिम खान (२०, रा. संजीव नगर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महम्मद शकील गरीब उल्ला खान (४२, रा. संजीवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी खुनाच्या घटनेनंतर नातलगांनी थेट पोलिस आयुक्तालयात मृतदेह नेण्याचा प्रयत्न केला, तर जिल्हा रुग्णालयात जखमीला नेताना दुचाकी थेट ‘कॅज्युअल्टी’पर्यंत नेली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिस आयुक्तालयानेही अंबड पोलिस ठाणे व चुंचाळे पोलिस चौकीसह सर्व गुन्हे शाखा आणि पथकांना ‘अॅलर्ट’ दिला. परिसरात शुक्रवारी (दि. ११) दुपारपर्यंत बंदोबस्त तैनात होता. हत्येनंतर काही तासांतच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता, घटनेमागे क्षणिक राग असल्याची उकल झाली. या प्रकारानंतर परिसरात पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला.

आई-वडिलांनी आयुष्य संपवलेलं, दादाने आभाळ पेललं, तीन अनाथ भावंडांची पोलिस दलात निवड

शिवी दिल्याचा गैरसमज?

मिराज आणि इब्राहिम घराजवळ उभे असताना संशयित एकमेकांशी बोलत तिथून जात होते. तेव्हा भाषा न समजल्याने संशयितांनी शिवीगाळ केल्याचा मिराज याचा गैरसमज झाला. त्यातून मिराज आणि संशयितांपैकी अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर मुलांनी मोठ्या भावासह त्याच्या मित्राला बोलावले. या चौघांनी मिळून मिराज आणि इब्राहिमवर लाकडी दांडक्यासह चॉपरने हल्ला चढविला. काही दिवसांपूर्वी लहान मुलांच्या भांडणातून दोन्ही गटांत किरकोळ वाद झाले होते. दरम्यान, भाषा न समजल्याने शिवीगाळ केल्याच्या संभ्रमातून गुरुवारी सायंकाळी वाद उफाळला. त्यातूनच हत्या झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती स्पष्ट केले.

नवीन वसाहतीत गुन्हेगारी

चुंचाळे, दत्तनगर या नवीन वसाहतींसह पाथर्डी गावात काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढत आहे. सतत प्राणघातक हल्ले, पिस्तूल बाळगण्याचे प्रकार तिथे होत आहेत. त्यामुळेच अंबड पोलिस ठाण्याच्या विभाजनासह स्वतंत्र चुंचाळे पोलिस ठाण्याची मागणी गृह विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. मात्र, त्याकडे गृह विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांना अपुऱ्या मनुष्यबळात परिस्थिती हाताळावी लागत आहे. शहरातल्या चुंचाळेसारख्या नवीन वसाहतींमध्ये परप्रांतीय कामगार वर्गासह मिश्र लोकवस्ती असल्याने लहान स्वरूपातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यातूनच मोठे गुन्हे घडत असल्याने पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागत आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधींसह गृह विभागानेही लक्ष वेधण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here