नवी दिल्लीः भारतीय नौदलासाठी सहा पारंपरिक पाणबुडी तयार करण्यासाठी ५५ हजार कोटींच्या मेगा प्रकल्पासाठी बोली लावण्याची प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. चिनी नौदलाची वाढती शक्ती पाहता या पाणबुडी भारताची सामरिक क्षमता वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. सरकारी सूत्रांनी रविवारी याबाबत माहिती दिली.

रणनीतिक भागीदारी मॉडेल अंतर्गत या पाणबुड्या भारतात तयार केल्या जातील, असं सूत्रांनी सांगितलं. यानुसार देशांतर्गत अत्याधुनिक लष्करी उपकरणे तयार करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी विदेशी संरक्षण कंपन्यांशी करार करण्यास देशातील कंपन्यांना परवानगी दिली जाईल. पाणबुडीचे वैशिष्ट्य आणि प्रकल्पाच्या संदर्भात आरएफपी (विनंती प्रस्ताव) देण्याच्या अन्य आवश्यक निकषांबाबत संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौदलाच्या वेगवेगळ्या पथकांद्वारे काम पूर्ण करण्यात आले आहे. यानुसार ऑक्टोबरपर्यंत आरएफपी जारी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकल्पासाठी दोन भारतीय शिपयार्ड

संरक्षण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी दोन भारतीय शिपयार्ड आणि पाच विदेशी संरक्षण कंपन्यांच्या नावांची यादी करण्यात आली आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत हा सर्वात मोठा उपक्रम म्हणून ओळखला जात आहे. अंतिम यादीत भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. एल अँड टी ग्रुप आणि सरकारी मझागाव डॉक लिमिटेड (MDL) या कंपन्या आहेत. तर निवडलेल्या विदेशी कंपन्यांमध्ये थायसिंक्रूप मरीन सिस्टम (जर्मनी), नवंतिया (स्पेन) आणि नेव्हल ग्रुप (फ्रान्स) यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

नौदल एकूण २४ पाणबुड्या खरेदी करणार

संरक्षण मंत्रालय सुरवातीला एमडीएल आणि एल अँड टीला आरएफपी देईल आणि कागदपत्रे मिळाल्यानंतर दोन्ही कंपन्या त्यांच्या तपशीलवार निविदा सादर करतील. यानंतर एल अँड टी आणि एमडीएलला निवडलेल्या पाच कंपन्यांमधून परदेशी भागीदार निवडावा लागेल. समुद्रातील आपली युद्ध क्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदलाने अणु हल्ल्याची क्षमता असलेल्या ६ पाणबुड्यांसह २४ नवीन पाणबुड्या खरेदी करण्याची योजना आखली आहे.

८-१० वर्षांत नौदल पूर्णपणे बदलेल

नौदलाकडे सध्या १५ पारंपारिक पाणबुड्या आणि दोन अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या आहेत. हिंद महासागरात चिनी सैन्याची वाढती उपस्थिती पाहता नौदल आपली क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. चीनकडे ५० हून अधिक पाणबुड्या आणि सुमारे ३५० जहाजं आहेत. पुढील ८ ते १० वर्षांत जहाजं आणि पाणबुडीची संख्या ५०० अधिक होईल, असं जागतिक नौदल विश्लेषकांचा दावा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here