ठाणे: आघाडी सरकारमधील नाराजी नाट्य काही थांबताना दिसत नाहीये. आता ठाण्यातील एका पोस्टरवरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. ठाण्यातील एका पोस्टरवर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा फोटो लावल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असून सरकार तिघांचं आणि नाव दोघांचंच, अशा शब्दांत काँग्रेसने आघाडी सरकारवर टीका केली आहे.

राज्यसरकारने एमएमआर क्षेत्रातील ८ महापालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र एसआरए प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचं जिल्ह्यातून स्वागत करण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करणारा एक बॅनर स्लम डेव्हलपर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनने तीन हात नाक्यावर लावला आहे. या बॅनरवर “ठाकरे सरकारची वचनपूर्ती” असं लिहिलं आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नगरविकास मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री याचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच याच बॅनर वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे. मात्र, या बॅनरवर एकनाथ शिंदे आणि आव्हाड यांचा मोठा फोटो लावण्यात आला असून थोरात यांचा फोटो अत्यंत छोटा लावण्यात आल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामुळे काँग्रेसनेही या बॅनरच्या बाजूलाच तेवढाच मोठा बॅनर लावून सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं?, असा सवाल केला आहे. या बॅनर्सवर काँग्रेसने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भला मोठा फोटो लावून हा सवाल केला आहे. राज्याच्या नियोजित प्रकल्पाचं श्रेय काँग्रेसला जातं, असं या बॅनवर नमूद केलं आहे. तसेच राज्यातील ठाकरे सरकारला काँग्रेसमुळेच राज्यात शिवसेनेची सत्ता आल्याची जाणीवही करून देण्यात आली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर लोकांचे जनकल्याण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आले असते का? असा सवालही या बॅनरमधून विचारण्यात आला आहे. ठाणे शहर काँग्रेस कमिटीने हे बॅनर लावले आहे.

काँग्रेसच्या जीवावरच ठाण्यातील दोन्ही मंत्र्यांना मंत्रिपदं मिळाली आहेत. दोघेही आमच्या मेहरबानीने मंत्री झाले असून त्याचा यांना विसर पडला आहे, अशी टीका ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. कालचे मुंगूस आणि साप एकत्र आले आहेत, आम्ही मात्र डोंबाऱ्याचा भूमिकेत आहोत, आम्ही मुंगुसाला आणि सापालही नाचवू शकतो, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here