लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी टोमॅटोच्या २० किलोंच्या क्रेटला जास्तीत जास्त ११०० रुपये, कमीत कमी २००, तर सरासरी ९०१ रुपये इतका दर मिळाला. हे दर अधिकच घसरण्याच्या भीतीमुळे टोमॅटो उत्पादक चिंतेत आहेत. उत्तरेकडील राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या मागणीत अचानक वाढ झाली. त्यातच पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक पाच ते सहा हजार क्रेटसपर्यंत येत असे. २० किलोंच्या क्रेटला २३०० ते २५०० रुपये इतका दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते.
सोमवारी २० किलोंच्या जाळीला जास्तीत जास्त २३०१, कमीत कमी ५००, तर सरासरी १८०० रुपये भाव मिळत होता. मात्र, नेपाळ येथून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला तसेच पंजाब, कर्नाटक राज्यांसह नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक सुरू झाल्याने टोमॅटोच्या शुक्रवारी २० किलोंच्या क्रेटचा सरासरी दर ९०१ रुपयांपर्यंत खाली आली आहे.
लासलगाव,मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत गेल्या महिन्याभरापासून गगनाला भिडलेले टोमॅटोचे भाव मोठया प्रमाणात खाली आले आहेत.ज्या टोमॅटोला प्रति किलो १५० ते २०० रुपये भाव मिळत होता आज त्याच टोमॅटोला प्रति किलो ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे. भावात अचानक घसरण सुरु झाली असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात नवीन टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजार येणार आहे त्यामुळे भावात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे पुढे ही भाव टिकून राहतील आणि आम्हांला दोन पैसे मिळतील या आशेवर आम्ही टोमॅटोची लागवड केली. मात्र, टोमॅटोच्या भावात घसरण होत असल्यामुळे आम्ही हवालदिल झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. टोमॅटोची आयात करण्यात आल्यामुळे भावात घसरण झाली त्यामुळे शासनाने टोमॅटोची आयात करू नये असं, एनीनाथ जाधव आणि सुरेखा जाधव या शेतकऱ्यांनी सांगितलं.