पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील मेट्रोच्या विस्तारासह आसपासच्या औद्योगिक वसातहीदेखील मेट्रोने जोडण्याची योजना प्रस्तावित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या वाघोली-शिरूर आणि नाशिक फाटा-खेड (राजगुरुनगर) या उन्नत मार्गांवर अत्याधुनिक ‘लाइट मेट्रो’ नियोजित असून, त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत आहे.

नाशिक फाटा ते खेड या मार्गावरील मेट्रो मोशी, चाकण, तळेगाव औद्योगिक वसाहत आणि खेड एसईझेडला उपयुक्त ठरू शकते. वाघोली-शिरूर मार्गावरील मेट्रो शिक्रापूर, रांजणगाव आणि सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतींसाठी उपयुक्त ठरू शकते. या दोन्ही मार्गांवरील प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत असून, लवकरच त्याचे स्वरूप निश्चित होईल, अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

Mumbai News: आजपासून रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल, उद्या शिर्डी वंदे भारत रद्द; कारण…

वाघोली ते शिरूर हा ५६ किलोमीटरचा उन्नत मार्ग असणार आहे. वाघोली, शिक्रापूर आणि रांजणगाव एमआयडीसी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटरदरम्यान वाढलेले नागरिकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असते. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या कोंडीचा रोजच सामना करावा लागतो. त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे काही सर्व्हेंमधून यापूर्वी समोर आले आहे. उन्नत मार्ग आणि मेट्रोमुळे या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होणार आहे.

नेतेमंडळी ताफा सोडून मेट्रोने प्रवास करणार का?, पत्रकारांच्या प्रश्नाला अजितदादांचं सकारात्मक उत्तर

चाकण, खेड मेट्रोशी जोडले जाणार

‘ऑटोमोबाइल क्षेत्रात भारताचा देशात सहावा क्रमांक होता. मात्र, अलीकडेच आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. पहिल्या क्रमांकावर चीन आणि दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. येत्या काळात या यादीत भारताला शीर्षस्थानी पोहोचवायचे आहे. त्यामध्ये पुण्याचा वाटा अधिक असेल,’ असे केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात नमूद केले आहे. ‘ऑटोमोबाइल हब’ अशी पुण्याची ओळख असून, त्यातील सर्वाधिक कंपन्या चाकण औद्योगिक वसाहतीत कार्यरत आहेत; तसेच खेड एसईझेडमध्येही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. हे महत्त्व ओळखून नाशिक फाटा ते खेड या प्रस्तावित उन्नत मार्गावर अत्याधुनिक लाइट मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे.

रांजणगावच्या कोंडीवर मेट्रोची मात्रा

पुणे – नगर महामार्गावरील रांजणगाव आणि सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक वसाहतीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. मात्र, येथे वाहतूक कोंडी ही भीषण समस्या आहे. करोनापूर्वकाळात येथील कंपन्यांनी वाहतूक कोंडीबाबत सरकारदरबारीदेखील गाऱ्हाणे मांडले होते. आता वाघोली ते शिरूर या प्रस्तावित उन्नत मार्गावर मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक वसाहतीलादेखील या मेट्रोचा लाभ होऊ शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here