जीएसटी आणि व्हॅटसंबंधी पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यावर पवार यांनी फडणवीस यांचा उल्लेख करून सविस्तर आकडेवारीसह पोस्ट लिहिली होती. आता त्यांचे मतदारसंघातील विरोधक माजी मंत्री शिंदे यांनी आरोग्य विषयावरून पवारांवर टीका केली. त्यावर पवार यांनी केंद्र सरकारच्या एका निर्णयाकडे लक्ष वेधून आपले आरोग्य विषयातही लक्ष असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘आरोग्याचा वाढता खर्च भागवताना राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येत आहे. अशातच आज एक बातमी वाचायला मिळाली ती म्हणजे ‘आरटीपीसीआर टेस्ट किट’, पीपीई किट आणि एन-९५ मास्क याचा राज्यांना करण्यात येणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या राज्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रकार आहे. ही करोना प्रतिबंधक साधने आजपर्यंत केंद्र सरकारकडून राज्यांना पुरवण्यात येत होती. खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही साधने केंद्राला कमी किंमतीतही मिळू शकतात. पण एकीकडे पेशंटची संख्या वाढत असताना या साधनांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला, हे चुकीचे आहे.’
आपल्या जीएसटी विषयक मुद्द्याचा पवार यांनी पुन्हा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘सर्वच राज्ये आज संकटात आहेत. त्यामुळं केंद्र सरकारने राज्यांना त्यांचे हक्काचे जीएसटीचे पैसे देणे गरजेचे होते. पण ते देण्याऐवजी केंद्र सरकारने कर्ज घ्यायला सांगितलं आणि आता तर करोना सुरक्षा साधनांचा पुरवठाही थांबवायचा निर्णय घेतला. याला जबाबदारी घेणे म्हणत नाहीत. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा.’
रोहित पवार प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मंत्रिपद नसले तरी एखाद्या मंत्र्याच्याबरोबरीचे स्थान त्यांना सरकार आणि प्रशासनातही मिळत असल्याचे दिसते. राष्ट्रवादीतून पुढे येत असलेले हे नवे नेतृत्व आता विरोधकांच्या निशाण्यावर असल्याचे पहायला मिळू लागले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times