पावसाचे ‘कमबॅक’ पुन्हा अनिश्चित
राज्यात या आठवड्यात पाऊस ‘कमबॅक’ करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, तरी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाकडून निराशा होण्याची चिन्हे आहेत. शहरात रविवारी ०.१, तर जिल्ह्यात ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १७ ऑगस्टपर्यंत उत्तर महाराष्ट्रात केवळ हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पावसाळ्याचा अडीच महिन्यांचा कार्यकाळ सरला आहे. आणखी दीड महिना म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा हंगाम आहे. परंतु, अजूनही अनेक जिल्ह्यांत आणि तालुक्यांत समाधानकारक पाऊस होऊ शकलेला नाही. ऑगस्ट महिन्यात, तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. या महिन्यातील पहिले १३ दिवस कोरडे गेले असताना आता १७ ऑगस्टपर्यंत नाशिकसह जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत पावसाच्या निव्वळ हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली असताना उत्तर महाराष्ट्रात मात्र पुढील आठवडा कोरडाच जाण्याची शक्यता आहे.
अधिक मासातील सुट्टीयोगाची ‘पर्वणी’
अधिक मासातील अखेरचा रविवार आणि जोडून सुट्ट्यांमुळे रविवारी शहरात धार्मिक पर्यटनास उधाण आले होते. पंचवटीत श्री रामकुंड ते श्री काळाराम मंदिर परिसरापर्यंत पहाटेपासूनच भाविकांनी मांदियाळी दिसून आली. वाण देण्यासह स्नान-दर्शनादी धार्मिक उपक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रामकुंड व परिसरास भेट देणाऱ्या भाविकांमध्ये राज्य-परराज्यातील भाविकांचीही संख्या मोठी होती. रविवारी सकाळपासूनच रामकुंडानजीकचे पार्किंग फुल्ल झाल्याचे दिसले. रामकुंडातही स्नानासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी महापालिका, पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवी संघटनांनी भाविकांना सहकार्य केले. गोदातटीची पुरातन मंदिरे, श्री कपालेश्वर मंदिर आणि श्री काळाराम मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. कपालेश्वर व काळाराम मंदिरात भाविकांच्या गर्दी व्यवस्थापनासाठी बॅरिकेडिंग करावे लागले. रविवारी सकाळच्या सत्रात रामकुंड, पंचवटी व तपोवनातील भेटी पूर्ण करून अनेक भाविकांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, वणी गडासह त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्गरम्य स्थळे आणि शिर्डी-सापुताऱ्याच्या दिशेने प्रस्थान करणे पसंत केले.