सत्यजित तांबे यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘निर्मला काकू, अर्थतज्ज्ञांशी जीडीपी ठरवण्याच्या पद्धतीबाबत चर्चा करताना..’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. तर, त्यांच्या याच ट्विटवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विरोधीपक्षाला टोला लगावला आहे. ‘सत्यजितची, परीक्षा का घेऊ नयेत हे समजून सांगता सांगता देखील अशीच काहीशी स्थिती होती,’ असा रिप्लाय त्यांनी हा व्हिडिओ रिट्विट करत दिला आहे.
दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे. ‘घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच, ‘महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही सरकारच्या पुढील एक आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत,’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
काय आहे त्या व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक काकू तीन तरुणांकडे तिच्या १८०० रुपयांचा हिशोब मागत आहे. ते तरुण तिला १८०० रुपयेच दिले अस सांगून दिलेल्या पैशांचा हिशोब समाजावून सांगत आहेत. मात्र, तरीही ती महिला मान्य करायला तयारच होत नाहीये. तरुणांनी तिला पाचशे रुपयांच्या तीन नोटा आणि दोनशेची एक आणि शंभरची एक नोट असे अठराशे रुपये दिले आहेत. तरुणांनी दिलेले पैसे तिला मान्य आहेत. मात्र ते १८०० रुपये नाहीत असा समज काकुंचा झाला आहे. तुम्ही मला दीड हजार आणि ३०० रुपये दिलेत. मला १८०० रुपये द्या, असं त्या म्हणतात. काकूंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच बरोबर नेटकऱ्यांनी #justiceforkaku हा हॅशटॅग ट्रेंड करत काकूंना न्याय मिळावी अशी मागणीही केली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times