निमित्त होतं, संभाजी ब्रिगेड केडर कॉन्क्लेव्हचं…. पुण्यातील ‘स्वोजस पॅलेस’ याठिकाणी शनिवारी शेकडो तरुण तरुणींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच संघटनेचे सदस्य-पदाधिकारी उपस्थित होते. समाजकारण आणि अर्थकारणावरील प्रश्नांसंदर्भात उपस्थित तरुणांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केलेच त्याबरोबर त्यांच्याशी संवादही साधला. कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायला लावून थेट त्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांचा शुक्रवारी स्मृतिदिन होता. यानिमित्ताने त्यांनी त्यांचे आईवडील आणि आजोबांनी आपल्यासहित सर्व भावंडांना कसे घडवले, आज आपली सर्व भावंडं आणि त्यांची कुटुंब कोणत्या क्षेत्रात आणि कशी कार्यरत आहेत याची माहितीही दिली.
पुरुष पहाटे शपथ घेणार, बायकांनी सडे घालून रांगोळ्याच काढायच्या का?
तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या अमरावती जिल्ह्यातून आलेल्या क्षिप्रा मानकर यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? असा सवाल विचारताना जोरदार फटकेबाजी केली. जिजाऊ-रमाई-सावित्री-रखमाबाई राऊत-तानुबाई बिर्जे-झलकारीबाई-मुक्ता साळवे यांच्यापासून महाराष्ट्र भूमीला न्याय देण्याकरिता अनेक महिलांनी खस्ता खाल्ल्या. महाराष्ट्र निमिर्तीसाठी एवढ्या महिलांनी भरीव योगदान देऊनही, कित्येक सत्ता आल्या आणि गेल्यात, पण इथल्या सत्ताधाऱ्यांना एकदाही या महाराष्ट्रभूमीला महिला मुख्यमंत्री द्यावीशी वाटली नाही, त्याचं कारण काय? असा थेट आणि निर्भीड प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी स्मितहास्य करून कानाला हात लावला आणि तरुणीची माफी मागितली. पण उत्तर देताना त्यांनी स्वत: आखलेल्या महिला धोरणाची सविस्तर माहिती दिली.
पवार म्हणाले, “आजपर्यंत मुख्यमंत्रिपदी एकही महिला बसली नाही, हे खरंय पण महिलांना विविध क्षेत्रामध्ये कायद्याने अधिकार मिळाला पाहिजे, यासंबंधीचं देशातलं पहिलं महिला धोरण महाराष्ट्रात राबवलं गेलं. त्याचा परिणाम नक्की झाला… पण तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंत झाला… नगरपालिका असोत की महानगरपालिका, तिथे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात दिसतात. आतापर्यंत आपण निम्ने अंतर गाठलं, आता पुढचं अंतर आपल्याला गाठावं लागेल. तुम्ही सांगाताय त्याप्रमाणे आम्हा लोकांना तसे निर्णय घ्यावे लागतील आणि तसे निर्णय घेण्याची आमची असेल… “
माझा पक्ष लहान आहे पण देशाच्या संसदेत पक्षाच्या तीन महिला खासदार आहेत. वंदना चव्हाण आणि फौजिया खान अतिशय चांगलं काम करतायेत. सुप्रियाबद्दल मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. ५ वेळेस तिला संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. महिलांना संधी दिली की महिला भरारी घेतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपदीही महिला बसेल, हे नक्की आपल्या सर्वांना दिसेल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
पवारांच्या उत्तरानंतरही तरुणीने संधी साधलीच… भल्या पहाटे ५ वाजता दोन पुरुष शपथविधी उरकतात, मग आम्ही पहाटे उठून सडा-सारवण आणि रांगोळीच काढायची का? असा तिखट सवाल तरुणीने केला. त्यावर पवारही खळखळून हसले अन् उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.