कोलकाता: पश्चिम बंगालच्या जाधवपूर विद्यापीठाचा विद्यार्थी स्वप्नदीप कुंडूच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. विद्यापीठात पहिल्या वर्षात शिकत असलेल्या स्वप्नदीपची एक डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांना डायरीत एक पत्र सापडलं आहे. हे पत्र स्वप्नदीपनं विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांना लिहिलं होतं. वरिष्ठ रॅगिंगवरुन धमकवायचे, असा उल्लेख या पत्रात आहे.पोलिसांना मुख्य वसतिगृहात एक डायरी सापडली आहे. याच वसतिगृहातच्या बाल्कनीतून स्वप्नदीप खाली पडला. डायरीमध्ये पोलिसांना पत्र सापडलं आहे. त्यात त्यानं काही सीनियर विद्यार्थ्यांच्या तक्रारी नमूद केल्या आहेत. सीनियर विद्यार्थी धमकावतात, असा उल्लेख पत्रात आहे. या पत्रात रुद्ग दादा नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख आहे. सीनियर असलेला रुद्र दादा सातत्यानं धमकावतो, असं स्वप्नदीपनं पत्रात लिहिलं आहे. रुद्र दादावर गंभीर आरोपरुद्र नावाचा सीनियर विद्यार्थी धमक्या द्यायचा. वसतिगृहातील सर्व ज्युनियर विद्यार्थ्यांना सीनियर्सची काही कामं करावी लागायची. कामं करण्यास नकार दिल्यास वसतिगृहाच्या छतावरुन खाली फेकलं जायचं, अशी धक्कादायक माहिती स्वप्नदीपनं लिहिलेल्या पत्रात आहे. वसतिगृहातले विद्यार्थी अमली पदार्थांचा वापर करतात, असा दावा करण्यात आला आहे. पत्राखाली स्वप्नदीपची स्वाक्षरीदेखील आहे. पोलिसांकडून पत्राची पडताळणी सुरू आहे. पत्रात स्वप्नदीपचं नाव आणि स्वाक्षरी आहे. स्वप्नदीपनं पत्र स्वत:हून लिहिलं की ते कोणीतरी त्याला लिहिण्यास सांगितलं, याचा तपास पोलीस करत आहेत. पत्राच्या तारखेमुळे संशय वाढला आहे. पत्रावर १० ऑगस्ट तारीख आहे. तर स्वप्नदीप ९ ऑगस्टला रात्री पावणे बारा वाजता बाल्कनीतून खाली पडला. पत्रातील हस्ताक्षर तपासून पाहण्यासाठी पोलिसांनी स्वप्नदीपच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे.