सोलापूर जिल्हा नेहमीच विचारांच्या पाठीशी राहतो हा जिल्हा पुरोगामी विचाराला पहिल्यापासून मान देत आला आहे. त्यामुळेच एक काळ असा होता की रामदास आठवले यांना या जिल्ह्यात उमेदवारी दिली. हा जिल्हा रामदास आठवले यांना माहीत होता, ना रामदास आठवलेंना हा जिल्हा ओळखत होता. तरीही विचाराच्या पाठीशी इथले मतदार राहिले. आणि रामदास आठवले यांना एकदा नवे दोनदा नव्हे तीनदा निवडून दिले. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा नेहमीच माझ्या आवडीचा जिल्हा राहिला आहे, असे मत शरद पवार यांनी आज बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यातील बोरगावचे उपसरपंच आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. रवींद्र पाटील यांचा या निमित्ताने शरद पवार यांनी सत्कार केला. त्यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांशी बोलत होते.
सोलापूरचा पालकमंत्री असताना मी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिले. यामध्ये उजनी धरण पूर्ण करण्याबरोबरच त्याचे कालवे पूर्ण करण्यासाठी नियोजन केले, प्रयत्न केले. येथील शेतकरी कष्टाळू आहेत. त्यामुळेच येथील फळबागा अधिक समृद्ध होत गेल्या. काल-परवा मंगळवेढ्याच्या दौऱ्यातही सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिला मला प्रत्यक्ष भेटून सांगत होत्या की आम्ही तुमच्या सोबत आहोत. या पाठबळामुळे मला नेहमीच उभारी मिळवत गेली आहे. ऊर्जा मिळत गेली आहे, असे पवार म्हणाले.
शरद पवार यांनी भाजपच्या एकूण कार्यपद्धतीवरही भाष्य केले. भाजप हा पाडापाडी करून सत्तेवर येणारा पक्ष आहे. यांची गोव्यात सत्ता नव्हती. भारताचा नकाशा उभा धरला, तर तळाला गोवा इथून सुरुवात होते. गोवा, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता नव्हती. पाडापाडी करून, पक्ष फोडून, आमदार फोडून ते सत्तेवर आले. कर्नाटकमध्ये काल-परवा त्यांची सत्ता गेली. तामिळनाडूमध्ये भाजप नाही. आंध्र प्रदेशमध्ये भाजप नाही. महाराष्ट्रात काय झाले सर्वांनाच माहित आहे. नाही म्हणायला फक्त गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. नाहीतर राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, असे शरद पवार म्हणाले.