१२ ऑगस्टला जगदीश्वरन यानं त्याच्या खोलीत जीवन संपवलं. चेन्नईतील क्रोमेपेट भागात ही घटना घडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. नीट परीक्षेत दोन वेळा अपयश आल्यानं तो विद्यार्थी नैराश्यात गेला होता. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना नोट आढळली नव्हती. त्याचे वडील सेल्वासेकर यांनी नीट प्रशासन मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.
सेल्वासेकर यांनी देखील आज टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. नीट परीक्षेविरोधात आंदोलन करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तामिळनाडू राज्याला नीट परीक्षेतून वगळलं जावं, असं त्यांनी म्हटलं होतं.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला असून विद्यार्थ्यांनी असे टोकाचे निर्णय घेऊ नयेत, असं ते म्हणाले. यावेळी स्टॅलिन यांनी राज्याचे राज्यपाल आर एन रवी यांच्यावर जोरदार टीका केली. नीट परीक्षेसंदर्भात तामिळनाडू राज्यानं एक विधेयक मंजूर केलं होतं. मात्र, राज्यपालांनी ते परत पाठवलं होतं, असं स्टॅलिन म्हणाले. नीट परीक्षेमुळं किती जगदीश्वरन सारखे कितीही जणांचा मृत्यू झाला तरी राज्यपालांचं मन बदलणार नाही, असं स्टॅलिन म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारनं जेव्हापासून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा लागू केली तेव्हापासून तामिळनाडू राज्यानं विरोध केलेला आहे. तामिळनाडूच्या सरकारनं नीट परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कशी हिताची नाही हे यापूर्वी अनेकदा सांगितलं होतं. त्याशिवाय तामिळनाडू सरकारनं एक विधेयक देखील संमत केलं होतं. आता या घटनेमुळं नीट विरोधात राज्यात पुन्हा एकदा संतापाची ठिणगी पडू शकते.