घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर
पीएम मोदी म्हणाले की, “शहराच्या आत राहणारे दुर्बल लोक, जे मध्यमवर्गीय कुटुंब स्वत:च्या घराचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही येत्या काही वर्षांत योजना घेऊन येत आहोत. शहरात राहणाऱ्या, भाड्याची घरे, झोपडपट्टी, चाळीत राहणाऱ्यांना कर्जाच्या व्याजात लाखोंची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील मोठी लोकसंख्या अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये राहते. २०११ च्या जनगणनेनुसार १७% शहरी लोकसंख्या झोपडपट्टीत राहते.
गृहकर्जाचा EMI किती वाढला
गेल्या एका वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मे २०२२ पासून रेपो दरात २.५% वाढ केली, परिणामी गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महागली आहेत. अशा स्थितीत अनेक दिवसांपासून लोकांना कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे, मात्र गेल्या तीन पतधोरण समिती बैठकीत रेपो दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असून नजीकच्या काळात दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
देशातील वाढती महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आणि यामुळे फेब्रुवारी २०२३ पर्यंत पॉलिसी रेट रेपो ६.५% वर पोहोचला. यानंतर आरबीआयने एप्रिल, जून आणि ऑगस्टमध्ये यात बदल केला नाही. अशा स्थितीत भाड्याने किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना कर्जदरात दिलासा मिळाल्यास त्यांना आपले हक्काचे घर घेण्याची संधी मिळेल. भारतात सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात विशेषतः मेट्रो शहरांमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे घर खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.