प्राथमिक माहितीनुसार गॅरेजमध्ये लागलेल्या आगीनंतर ही आग गॅस स्टेशनजवळ पोहोचली होती. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.सोमवारी रात्री एका गॅरेजमध्ये आग लागली होती. त्यानंतर ती आग गॅस स्टेशनपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टसनुसार शोधकार्य आणि बचावकार्य सुरु आहे. आपत्कालीन सेवांच्या कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य देखील सुरु करण्यात आलं होतं.
गॅस स्टेशनला आग लागून घडलेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार १०५ जण जखमी झाले असून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरु असल्यानं मृतांची संख्या देखील वाढू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
गॅरेज आणि गॅस स्टेशनला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राथमिक अहवालानुसार गॅस स्टेशनवरील आठ टँक पैकी दोन टँकचा स्फोट झाला.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर, स्थानिक सरकारनं एक दिवसाचा दुखवटा देखील जाहीर केला आहे.
१०५ जण जखमी
सुरुवातीला या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, नंतर मिळालेल्या माहितीनुसार ३० जणांचा मृत्यू झाला असून १०५ जण जखमी झालेले आहेत. यातील बरेच जण भाजले असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना कशी घडली याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरु करण्यात आली असून दोषींवर कारवाई होणार का हे पाहावं लागेल.