चिनी सैनिकांनी भारतीय टेकड्यांवर फक्त कब्जाच केला नाही तर तिथे बांधकामही सुरू केलं आहे. थाकुंग पोस्ट (Thakung post) येथील भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापटही झाली आहे. पण तिथे कुठलाही गोळीबार झालेला नाही. तसंच भारतीय जवाणांची कुठलीही हानी झालेली नाही, अशी माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिल्याचं बिझनेस स्टँडर्डने वृत्तात म्हटलं आहे.
पँगाँग सरोवराच्या दक्षिणेस असलेल्या हेल्मेट टॉप आणि त्याला लागून असलेल्या ब्लॅक टॉप या टेकड्यांवर चिनी सैनिकांनी कब्जा केला आहे. या दोन्ही टेकड्या प्रत्यक्ष ताबा रेषेच्या अलिकडील भारताच्या हद्दीतील आहेत. या टेकड्यांवरून चिनी सैन्याला पँगाँग सरोवरच्या भागातील भारतीय जवानांच्या हालचालींवर नजर ठेवता येणार आहे. एवढचं नव्हे तांत्रिक दृष्ट्या भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या चुशूल येथील शिबंदीवरही लक्ष ठेवता येणार आहे.
दरम्यान, २९ आणि ३० ऑगस्ट रात्री चिनी सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या भागात घुसखोरीचा प्रयत्न केला. चिथावणीखोर हालचाली करून प्रत्यक्ष ताबा रेषेवरी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही देशांमध्ये चर्चेत झालेल्या निर्णयांचे चिनी सैन्याने उल्लंघन केल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे. तसंच चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्नही भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. चिनी सैनिकांचा भारतीय भूभागावर कब्जा करण्याचा डाव होता, असं लष्कराने स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरू असल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं.
तर चिनी सैन्याने उलट्या बोंबा ठोकल्या आहेत. भारतीय जवानांनीच ३१ ऑगस्टला चीनच्या सीमेत दोन ठिकाणी अवैधरित्या प्रवेश केला. भारताने चिथावणीखोर कारवाई केलीय आणि सीमेवरील तणावाला कारणीभूत ठरणारी आहे, असं चिनी सैन्याच्या पश्चिम कमांड म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times