लखनऊ: उत्तर प्रदेशच्या शाहजहापूर जिल्ह्यात लेकीला खांद्यावर बसवून नेत असलेल्या तरुणावर गोळी झाडण्यात आली. जखमी तरुणावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. आरोपींनी तरुणावर पॉईंट ब्लँकवरुन गोळी झाडली. त्यावेळी बुलेटच्या काडतुसातील दारु उडाल्यानं पीडित तरुणाच्या एक वर्षाच्या लेकीच्या चेहऱ्याला इजा झाली. तिच्यावरही उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता शोएब त्याच्या लेकीला खांद्यावर बसवून कुरकुरे आणण्यासाठी जात होता. तितक्यात आरोपी तारिक समोरुन आला. त्यानं शोएबच्या कानशिलात गोळी झाडली. यााबद्दल विचारणा केली असताना शोएबचे काका सलीम यांनी वादामागचं कारण सांगितलं. ‘शोएबची पत्नी चांदनी हिची आई आणि मुशरान आणि तारीक या दोन भावांची आई या बहिणी आहेत. चांदनीचा विवाह मुशरानसोबत करा, असं सगळे गमतीत म्हणायचे. पण मुलं मोठी झाली आणि त्यांचे इरादे बदलले. त्यावर कोणालाच आक्षेप नव्हता. चांदनीचा विवाह माझा भाचा शोएबसोबत झाला,’ अशा शब्दांत सलीम यांनी घटनाक्रम कथन केला. चांदनीचा निकाह शोएबसोबत झाला. यामुळे आपल्या घराचा अपमान झाल्याचं मुशरानचा भाऊ तारीकला वाटू लागलं. त्याचा बदला घेण्यासाठी त्यानं मावस भाऊ गुफरान आणि मित्र नदीम यांना सोबतीला घेतलं. शोएबवर जीवघेणा हल्ला करायचा असं त्यांनी ठरवलं. त्यांचा मनसुबा पूर्ण झाला. या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात तारीक शोएबवर गोळी झाडताना दिसत आहे. यानंतर शोएबला बरेलीहून दिल्लीला शिफ्ट करण्यात आलं. सध्या त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. शोएबवर गोळी झाडली गेली तेव्हा त्याची एक वर्षाची लेक त्याच्या खांद्यावर होती. बंदुकीतून गोळी सुटल्यावर काडतुसातील दारु बाहेर उडाली. त्यामुळे तिच्या चेहऱ्याला इजा झाली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुफरान आणि नदीमला बेड्या ठोकल्या आहेत. तर मुख्य आरोपी तारीक अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेसाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here