कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आठवड्याभरात मृत्यूचे तांडव झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याठिकाणी अतिदक्षता विभागाची क्षमता संपल्याने येथील पाच रुग्णांना सिव्हिल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पाठवण्यात आले. सिव्हिल रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने प्रादेशिक मनोरुग्णालयाशेजारी हे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले आहे. कळवा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची क्षमता ४० खाटांची असून सध्या या ठिकाणी ३९ रुग्ण दाखल आहेत. तसेच सिव्हिल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची क्षमता २४ खाटांची असून कळव्यातील पाच रुग्ण या ठिकाणी आणल्याने येथील क्षमताही संपली आहे.
दरम्यान, आठवड्याभरापासून कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचे आकडे दिवसागणिक वाढत होते. मात्र, मंगळवारी हा आकडा कमी झालेला दिसला. या दिवसात दोन बालकांचा मृत्यू झाला. यातील एक रुग्णालयात आणले तेव्हात मृत झाले होते, तर दुसऱ्याला हृदयविषयक समस्या असल्याने त्याचा २० मिनिटांतच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
पालिका आयुक्तांचे चार तास ठाण
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालिका मुख्यालयातील ध्वजारोहन कार्यक्रमानंतर ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तब्बल चार तास आयुक्त बांगर याठिकाणी ठाण मांडून होते. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली होती, यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. खाटा उपलब्ध नसल्यास रुग्णांना सिव्हिल किंवा मुंबईला इतर रुग्णालयात पाठवावे लागल्यास त्यांना रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच, रुग्णांना लागणारी औषधे रुग्णालयातच उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे. औषध भांडार विभागात औषधांचा साठा नियमित उपलब्ध असेल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच ज्या चाचण्या रुग्णालयात केल्या जातात, त्या चाचण्या रुग्णालयातच होतील याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे महत्त्वाचे निर्देश त्यांनी दिले.
कळवा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला येथील खाटांच्या उपलब्धतेनुसार वॉर्ड, अतिदक्षता विभागात ठेवले जाईल. याठिकाणी खाटा नसल्यास यंत्रणेकडून समन्व्य साधत संबंधित रुग्णाला सिव्हिल रुग्णालयात हलवले जाईल.
– अभिजित बांगर, आयुक्त, ठाणे महानगरपालिका