अहमदनगर: राज्यात विखे आणि पवार कुटुंबातील राजकीय वैर सर्वसुश्रत आहे. त्यांची तिसरी पिढी मात्र एका बायपासच्या कामासाठी एकत्र येणार आहे. तशी इच्छा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली असली तरी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची यासंबंधीची भूमिका अद्याप स्पष्ट व्हायची आहे.

कर्जत शहरातील बायपास रस्त्याचा प्रश्न सध्या गाजतो आहे. कर्जत-बारामती रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. यामध्ये कर्जत शहरातील काही गाळे पाडावे लागणार आहेत. त्यामुळे तसे न करता शहराला सुमारे ४० किलोमीटरचा बायपास करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी विखे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडाही तयार केला आहे. यातून गाळेधारकांना दिलासा मिळणार असला तरी अन्य व्यापारी आणि ज्यांच्या शेतातून बायपास जाणार आहे, त्यांच्याकडून विरोध सुरू झाला आहे. शेत जमीन जाणार आणि बायपास झाल्यावर शहरातील बाजारपेठ ओस पडणार असे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. पवार लवकरच कर्जतला येऊन यासंबंधी बैठक घेणार आहेत.

वाचा:

तत्पुपूर्वी डॉ. विखे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना त्यांनी सामोपचाराची भूमिका घेत पवारांना सोबत घेऊन हे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. विखे म्हणाले, ‘विखे-पवारांच्या वादात अनेकांनी बंगले बांधले आहेत. आम्ही कधीच एकत्र येत नाहीत असे आतापर्यंतचे राजकारण सांगते. ते राज्याने पाहिले आहेच. पण असाच संघर्ष कर्जतच्या बायपाससंबंधी झाला तर गाळेधारक संकटात येतील. तसे होऊ नये यासाठी मी आणि आमदार रोहित पवार एकत्र येऊ. एकत्र बसून सर्वांच्या हिताचा निर्णय घेऊ. आम्हा दोघांनाही लोकांनी विकासासाठी निवडून दिले आहे. अशा परिस्थिती चुकीचे निर्णय घेऊन कोणाचे संसार उद्ध्वस्त झाले तर लोक आम्हालाच जबाबदार धरून प्रश्न विचारतील. हाच का तुमचा विकास, असा सवाल करतील. त्यामुळे एकत्र येऊन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.’

वाचा:

आता विखे यांच्या भूमिकेवर पवार यांची काय भूमिका राहणार याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वीही या दोघांनी एकत्र येण्याचा विचार बोलून दाखविला आहे. प्रत्यक्षात मात्र, अद्याप तरी तसे झालेले पहायला मिळालेले नाही. आता या बायपासच्या निमित्ताने खरेच वैर बायपास करून प्रश्न सोडविला जातो की ताणला जातो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here