राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दिवंगत नेते आर. आर. पाटील (आबा) यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही वैचारिक मतभेद आणि नात्यांमध्ये असलेला ओलावा यात कधीही फरक करत नाही. एन डी पाटील यांच्या पत्नी या पवारांच्या बहिण आहेत मात्र तरीही एनडी पाटील अनेकदा पवारांच्या विरोधात होत्या. त्यांचे वैचारिक मतभेद होते. मात्र आमच्या नात्यांमधला ओलावा कधीही कमी झाला नाही. त्याच पद्धतीने अजित दादा आणि पवार साहेब यांच्यामधील नात्यांमधील ओलावा हा कुठेही कमी झालेला नाही. मात्र पक्षातील वैचारिकतेवर आम्ही नेहमीच एकमेकांविरोधात असणार आहे. आमचे विचार आणि दादांचे विचार यात फरक आहे. मात्र त्यात कुटुंबातील नात्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. दादा आणि पवार साहेबांच्या भेटीमुळे महाविकास आघाडी कुठलेही संभ्रम नाही. आज संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य आपण ऐकलं असतं तर कदाचित आपण हा मला प्रश्न विचारला नसता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मलिक दादांसोबत जातील का? सुप्रिया सुळे म्हणतात….
नवाब मलिक हे नुकतेच जेलमधून बाहेर आलेले आहेत. ते त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत. मात्र ते तिकडे जातील असं वाटत नाही. कारण नवाब मलिकांवर त्यांनी आरोप केले. मलिकांना त्यांनी त्रास दिला. संपूर्ण महाराष्ट्राला हे माहिती आहे. नवाब मलिक हे त्याच व्यक्तींच्या विरोधात बोलले म्हणून त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्यांच्या दोन्ही मुली या लढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्यावेळीही त्यांच्या मुली या लढत होत्या. त्यामुळे नवाब मलिक असा निर्णय घेतील असं वाटत नाही, असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.