या बैठकीत नगर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा जागा लढायच्या याबाबत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. या लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे. त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे. सुजय विखे पाटलांचा पराभव आपल्याला करायचा आहे, तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. नगर जिल्ह्यात नगर आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदार संघात १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड एवढे विधानसभा मतदारसंघ नगर जिल्ह्यात आहेत. या सर्व ठिकाणी कशाप्रकारे मोर्चेबांधणी करायची, याची रणनीती मातोश्रीवरील आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आली.
जळगावातील दोन्ही जागांसाठी प्लॅनिंग
जळगावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या. उद्धव ठाकरे यांनी जळगावातील शिवसैनिकांना जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात पक्षाचं संघटन मजबूत करण्यास सांगितलं आहे. लोकसभेच्या दोन्ही जागांसह ११ विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी सुरु करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत.
जळगावातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे तर जळगावमध्ये उन्मेश पाटील खासदार आहेत. जळगावातून शिवसेनेचे एकूण चार आमदार निवडून आले होते. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील आणि लता सोनावणे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. हे सर्वजण ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात गेले होते. त्यामुळे आता या सर्व जागांवर नवे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे आहे.
लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकांचे वेळापत्रक
१८ ऑगस्ट
दुपारी साडेबारा – मावळ
दुपारी दीड- शिरूर
दुपारी साडेचार – बारामती
दुपारी साडेपाच – पुणे
१९ ऑगस्ट
दुपारी साडेबारा – सातारा
दुपारी दीड- सांगली
दुपारी साडेचार – कोल्हापूर
दुपारी साडेपाच – हातकणंगले