मुंबई: राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी असलेली ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर मध्य व्यवस्थापनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तसे राज्य सरकारला कळवण्यात आले आहे. उद्या २ सप्टेंबरपासून रेल्वेचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. तशी घोषणाच मध्य रेल्वेने आज केली आहे. याबाबतचं एक पत्रक जारी करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यात जाहीर करतानाच गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. त्याला अनुसरून मध्य रेल्वेने आज एका पत्राद्वारे राज्य सरकारला महत्त्वाची माहिती दिली आहे. सरकारने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा दिली असल्याने रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक आम्ही सुरू करत आहोत. त्यासाठी प्रवासी आरक्षण सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे. २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाचे बुकिंग प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर करता यईल, असे मध्य रेल्वेने नमूद केले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक डी. वाय. नाईक यांनी याबाबतचं पत्र राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर आणि परिवहन सचिव अशोक कुमार सिंग यांना पाठवलं आहे. याचा फार मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे. या प्रवासी वाहतुकीचे नियम काय असतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान, राज्य सरकारने ३० सप्टेंबर पर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन वाढवला आहे. बाकी भागांत मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे ई-पासची अट रद्द करताना खासगी बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. २ सप्टेंबरपासून ही नियमावली लागू होणार आहे. यामुळे जिल्हाबंदीतून नागरिकांची सुटका झाली असून हा फार मोठा दिलासा ठरला आहे. आता राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू झाल्यास प्रवाशांची खूप मोठी कोंडी दूर होणार आहे.

लोकलसेवेला मुहूर्त कधी?

मुंबई गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल धावत आहेत. त्यामुळे अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. लोकलसेवा सुरू करण्यासाठी नालासोपारा येथे प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून आंदोलनही केले. मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारची परवानगी मिळाल्यास लोकलसेवा सुरू करण्यास आम्ही तयार आहोत, असे स्पष्ट केले होते. मात्र मुंबई मेट्रो आणि मुंबईतील लोकलसेवेबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here