मुख्यमंत्र्यांचे स्नेहभोजन हे १५ ऑगस्टपूर्वी किंवा नंतर स्वातंत्र्यदिनासाठी विदेशांतून आलेल्या राजदूतांसाठी असते. ते आमदारांसाठी म्हणून नसते. म्हणून उद्या मी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही तर शिरसाट नाराज आहेत म्हणून ब्रेकिंग न्यूज चालवू नका, असेही शिरसाट म्हणाले. बच्चू कडू यांनी काय म्हटले हे मला माहीत नाही. परंतु त्यांच्याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या भेटीविषयीदेखील त्यांनी भाष्य केले. ते मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेले होते. मलिक यांनी आता प्रकृतीची काळजी घ्यावी. अल्लाहचे नाव घ्यावे. मलिक यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाबाबत बोलण्याआधी ते कुठे जातात. ते आधी त्यांना ठरवू द्या. मग आम्ही भूमिका घेऊ, असेही ते म्हणाले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष कोणाचा?
महाराष्ट्रासह देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचा गट ठाम असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संभाव्य दिलजमाईचा प्रश्न निकालात निघाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षनाम, दहा वाजून दहा मिनिटांचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार गटाने उभय सभागृहातील आमदार, खासदारांच्या मिळून ४० जणांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल पुढील महिन्यात लागणे अपेक्षित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर निवडणूक आयोगाकडे दावा दाखल केल्यानंतर आयोगाने दोन्ही गटांना म्हणणे सादर करण्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत गुरुवारी संपुष्टात आली असली, तरी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या गटाचे म्हणणे मांडण्यासाठी आयोगाने आणखी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल देण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढीची मागणी केली होती. ती मागणी आयोगाने मान्य केली. येत्या ८ सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिले आहेत.
भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाच्या मंत्री व आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार यांनी पुन्हा जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघानंतर बीड जिल्ह्यातील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुरुवारी शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. ‘माझे वय झाले म्हणतात ठीक आहे. तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचे आहे; परंतु निदान आयुष्यात ज्यांच्याकडून तुम्ही काही घेतले असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा प्रयत्न करा. असे केले नाही तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा इशारा शरद पवार यांनी बीडच्या सभेत दिला.
अजित पवार यांची प्रत्युत्तरसभा
शरद पवार यांच्या जाहीर सभेनंतर पुढील आठवड्यात अजित पवार गटही त्याच ठिकाणी प्रत्युत्तरसभा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत भांडणाचा कलगीतुरा दोन्ही गटांच्या सभांमुळे चव्हाट्यावर येणार आहे.