अहमदपूरकर महाराजांचे देशभरात लाखो भाविक होते. त्यांच्या जाण्यानं लिंगायत समाजात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच ते जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. त्या दरम्यान भाविक अहमदपूर येथे जमले होते. मात्र, पोलिसांनी आणि आश्रम प्रशासनानं गर्दी लक्षात घेऊन वेळीच ही अफवा असल्याचं जाहीर केलं होतं.
शिवाचार्य यांचा जन्म १९१७मध्ये झाला होता. १९३२ साली वीर मठ संस्थान अहमदपूरचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची घोषणा झाली होती. वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांचा जवळचा संबंध होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे.’ असं त्यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times