नागपूरः अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शासनाकडून १० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे आदेश दिले आहेत.

गेल्या १०० वर्षात पूर्व विदर्भात प्रथमच पूरपरिस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यालाही पुराचा तडाखा बसला आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना दहा हजारांची तातडीची मदत जाहीर केली आहे. तर, येत्या एक-दोन दिवसांत खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती, विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्हयात पीकहानी, घरे पडणे, रस्ते व पूल वाहून जाणे, अशा स्वरुपाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं युद्धपातळीवर पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसंच, पूरग्रस्त् भागात सध्याच्या काळात महामारी पसरणार नाही यासाठी पिण्याचे शुध्द पाणी, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था, नियमित वीज पुरवठा, रोहीत्रे व रस्ते दुरूस्ती याकडे लक्ष वेधण्याचे निर्देश दिले होते.

प्राथमिक अंदाजानुसार विभागातील १४ तालुक्यांना पुराचा जोरदार फटका बसला असून ९० हजार ८५८ नागरिक पूर बाधित आहेत. यापैकी ४७ हजार ९७१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यंत्रणेला यश आले आहे. विभागात एकूण १३८ पुनर्वसन केंद्रात ९ हजार ९८२ पूर बाधितांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती, डॉ.संजीवकुमार यांनी दिली. ही माहिती प्राथमिक स्वरूपात असून सर्वेक्षणानंतर सर्व विभागाची एकत्रित माहिती पुढे येईल.

कशामुळे आला पूर?

पावसाची संततधार थांबल्यानंतर पूर ओसरणार अशी शक्यता व्यक्त होत असतानाच मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला. वेळीच गोसेखुर्द प्रकल्पाची दारे उघडून पूरनियंत्रण करणे आवश्यक होते. पण, प्रशासन गाफिल राहिल्याने भंडारा शहरासह ५८ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here