अहमदाबाद: हिंसाचाराच्या घटनेमुळं गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठासंदर्भात भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी एक वक्तव्य केलं आहे. विद्यापीठाच्या परिसरात पोलीस ठाणे उभारून तेथे बीएसएफ किंवा सीआरपीएफ तैनात करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. जेएनयू दोन वर्षांसाठी बंद करून आवश्यक पावलं उचलावीत आणि त्यानंतर पुन्हा ते खुलं करण्यात यावं. जेएनयूचं नाव बदलून सुभाषचंद्र बोस विद्यापीठ करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

अहमदाबादच्या इंडस विद्यापीठाच्या एका कार्यक्रमानंतर स्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘सुरक्षेचा अर्थ प्रत्येक कॅम्पसमध्ये एक पोलीस ठाणे उभारलं गेलं पाहिजे. तु्म्हाला पोलिसांना पाचारण करावं लागतं. त्यात खूप वेळ जातो. देशातील विद्यापीठांमध्ये पोलीस ठाणे उभारलं जाणं आवश्यक आहे. हे केवळ जेएनयूसाठी बोलत नाही, पण त्याची सुरुवात जेएनयूमधूनच करायला हवी,’ असंही स्वामी म्हणाले.

अमेरिकेच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये एक पोलीस ठाणे आहे. जेएनयूसाठी फक्त दिल्ली पोलीस नव्हे, तर बीएसएफ आणि सीआरपीएफची एक चौकी असली पाहिजे, असं स्वामी म्हणाले. जेएनयू दोन वर्षांसाठी बंद केलं पाहिजे. जोपर्यंत ते बंद केलं जात नाही, तोपर्यंत सुधारणार नाहीत, असं सांगत त्यांनी जेएनयूवर हल्लाबोल केला. जेएनयूमध्ये अशिक्षित आणि अपात्र लोकांना जाणूनबुजून काँग्रेस सरकारच्या काळात प्रवेश दिला गेला. जेएनयू हॉस्टेलचं भाडं १० रुपये आहे आणि तिथे ३५-४० वर्षांपासून काही लोक राहताहेत. ते दरवर्षी अनुत्तीर्ण होतात. दिल्लीत कॅम्पसमध्ये राहण्यासाठी जागा मिळावी, असा एकमेव उद्देश जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा आहे, असंही स्वामी म्हणाले.

जेएनयूमध्ये बहुतेक प्राध्यापक डावे

जेएनयूमध्ये बहुतेक प्राध्यापक हे डाव्या विचारांचे आहेत. जे डावे नाहीत, त्यांना रोखलं जातं. या अशा प्रकारच्या घटनांनंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळं दोन वर्षे हे विद्यापीठ बंद करावं. जेएनयूमधील चांगल्या विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठात प्रवेश दिला जावा. आवश्यक कार्यवाहीनंतर दोन वर्षांनी पुन्हा विद्यापीठ खुलं करावं, असंही स्वामी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here