गोरेगाव, मालाड, कांदिवली या पूर्व भागांतील एकूण ३ हजार १०५ घरगुती गणपतींचे, तर ३२६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे या दोन भागांतील अनेकांसाठी आरे तलाव सोयीस्कर ठरतो. मात्र पर्यावरण आणि संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड) म्हणून घोषित असल्याने वनशक्ती संस्थेचे संचालक आणि पर्यावरणवादी स्टॅलिन यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने या तलावात मूर्तींचे विसर्जन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी आरे दुग्ध वसाहतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून आरे तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. तसेच मुंबई महापालिकेतर्फे आरे कॉलनीच्या बाहेर कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
मात्र या निर्णयाला मुंबई उपनगर गणेशोत्सव समन्वय समितीने विरोध केला आहे. समितीचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांची गैरसोय होणार असल्याचे म्हटले आहे. या तलावात विसर्जन करू द्यावे, यासाठी परवानगी मागितली असल्याचे ते म्हणाले. हा निर्णय तात्काळ बदलून आरे तलावातच विसर्जनाची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ही बंदी न हटवल्यास आंदोलन केले जाईल व आरे तलावातच विसर्जन केले जाईल, अशा इशाराही भातखळकर यांनी दिला.
गोरेगाव, मालाड, कांदिवली पूर्व भागातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशमंडळांच्या मूर्तींचे विसर्जन आरे तलावात होते. मात्र तेथे अचानक निर्बंध घातल्याने अनेकांची गैरसोय होणार आहे. यंदा तरी आरे तलावात विसर्जनाची करू द्यावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
राजेश अक्रे, सहायक आयुक्त, पी दक्षिण विभाग
केंद्र सरकारने आरे तलावाला पर्यावरण आणि संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे. तरीही या तलावात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या तलावात विसर्जनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. याला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव तयार करण्याचीही मागणी आम्ही केली आहे.
स्टॅलिन दयानंद, संचालक, वनशक्ती संस्था