अहमदनगर: नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघासाठी २०१९ च्या निवडणुकीत तगडी फाईट झाली आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे चार लाखांहून अधिक मत घेत संसदेत पोहोचले. याच मतदारसंघातून लढण्यासाठी कधी रामदास आठवले इच्छा व्यक्त केली तर कधी ठाकरे गटाकडून बबनराव घोलप यांचं नावाची चर्चा झाली. पण, आता लोकसभेच्या निवडणुकीला अवघे आठ महिनेच बाकी असताना ठाकरे गटाकडून माजी खासदाराचं नाव समोर आलंय. मातोश्रीवर पार पडलेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत या उमेदवाराचं नाव घोषित केलं असून हा नेता लवकरच घरवापसी करणार आहे. राजकारणाच्या एन्ट्रीलाच दिग्गजाला धूळ चारलेला हा नेता नेमका कोण आहे? शिर्डी लोकसभा मतदारसंघातलं गणित नेमकं काय? ठाकरे गटाचा नवा मोहरा एकनाथ शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांना कशी लढत देणार? याची जोरदार चर्चा जिल्ह्यीतील राजकारणात होऊ लागली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात स्थानिक नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनीच व्यक्त केली. त्यामुळं शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाऊसाहेब वाकचौरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे. वाकचौरे हे येत्या २३ ऑगस्टला मातोश्रीवर येऊन पुन्हा शिवसेना ठाकरे गटात घरवापसी करणार आहेत.

कोण आहेत भाऊसाहेब वाकचौरे?

भाऊसाहेब वाकचौरे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यातील. प्रशासकीय सेवेत असताना सात वर्ष साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी, त्यामुळे दांडगा जनसंपर्क. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत भाऊसाहेबांनी रामदास आठवले यांना पराभवाची धूळ चारली. मात्र, लगेचच पुढच्या म्हणजेच २०१४ च्या निवडणुकीत शिवबंधन झुगारून त्यांनी काँग्रेसचा हात धरला. २०१४ साली शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली मात्र, मोदी लाटेत युतीच्या सदाशिव लोखंडे यांच्याकडून वाकचौरेंना पराभव स्वीकारावा लागला.

भाजप-शिंदे गटानंतर मतदारसंघात काँग्रेसची एन्ट्री, अमित देशमुखांचा दौरा, ठाकरेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं!

निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर भाऊसाहेबांनी तेव्हाचं भाजपचं कमळ हाती घेतलं. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने तेथून विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र, खासदारकीनंतर पुन्हा आमदारकीलाही अपयश आलं. पुढे २०१९ ला भाऊसाहेबांनी शिर्डी लोकसभा अपक्ष उभे राहत लढवली पण तिथेही पराभव झाला. बघायला गेलं तर शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि आता अपक्ष असा वाकचौरे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सदाशिव लोखंडेंकडे आहे. शिवसेनेच्या बंडाळीनंतर त्यांनीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. अशातच आता सदाशिव लोखंडे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे हे आव्हान देण्याची शक्यता आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांची एन्ट्री होत असल्याने निष्ठावान शिवसैनिक काय भूमिका घेणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

दरम्यान, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे शिर्डीत आले होते. तेव्हा त्यांनी मंचावरून बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानुसार बबनराव घोलप यांनी लोकसभा मतदारसंघातील गाठीभेटी आणि पक्षाचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली . मात्र, आता भाऊसाहेब वाकचौरे यांच्या एन्ट्रीने सगळी गणितं बदलू शकतात. दुसरीकडे केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे.
आठवले यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने लोखंडे यांचे टेन्शन वाढू शकतं.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा, १६ मतदारसंघाच्या आढावा बैठकांचं प्लॅनिंग ठरलं, यादी समोर
यामुळे शिंदे गट शिर्डीची जागा रामदास आठवलेंना जागा सोडणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यात भाऊसाहेब हे स्थानिक उमेदवार असले तरी बदलेल्या राजकीय घडामोडींनंतर मतदार त्यांच्या पारड्यात कौल टाकणार की शिंदे-भाजप सरकारच्या उमेदवाराला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. ठाकरेंचा नवा शिलेदार पुन्हा एकदा संसद गाठणार का? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here