न्यायमूर्ती मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देताना शिवलिंगाची झिज होऊ नये आणि त्याच्या संवर्धनासाठी निर्देश दिले. ‘कोणताही भक्त मंदिरातील शिवलिंगावर पंचामृत वाहणार नाही. त्याऐवजी ते शुद्ध दुधाने पूजा करतील’, असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत स्पष्ट केलं. ‘महादेवाच्या कृपेने हा शेवटचा निकालही झाला’, असं निकाल दिल्यानंतर न्यायमूर्ती मिश्रा यांनी आपल्या साथीदारांना निकालानंतर सांगितलं. या निर्णयामुळे न्यायमूर्ती मिश्रा यांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व आत्मसंतुष्टी होती. न्यायमूर्ती मिश्रा यांचा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून मंगळवारी शेवटचा दिवस होता.
शिवलिंगावर शुद्ध दूध वाहता येणार
उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर प्रकरणी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंगळवारी निकाल दिला. मंदिर समितीने भाविकांकरिता शुद्ध दुधाची व्यवस्था करावी. कुणीही शिवलिंगवर अशुद्ध दूध वाहणार नाही याची काळजी समिती घ्यावी, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मंदिरातील शिवलिंगच्या संवर्धनासाठी अनेक आदेश जारी केले.
पूजेच्या ठिकाणाचे रेकॉर्डिंग २४ तास
भस्म आरतीत अधिक सुधारणा करावी ज्यामुळे शिवलिंगचे संवर्धन होईल. यासाठी सर्वोत्तम पद्धतीचा उपयोग करावा. शिवलिंगवरील मुंड माळांचं ओझं कमी करावं. धातुची मुंड गरजेची आहे की नाही याचा विचार करा. यासह गर्भगृहातील पूजा स्थळाचे २४ तास रेकॉर्डिंग केले जाईल आणि हे रेकॉर्डिंग सहा महिन्यांपर्यंत जतन केले जाईल. या प्रकरणी कोणत्याही पुजाऱ्याने आदेशाचे उल्लंघन केल्यास मंदिर समिती त्याच्यावर कारवाई करू शकते, असं न्यायालयाने सांगितलं.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी आपला निरोप समारंभ आयोजित करण्यास आणि केला तर त्यात सहभागी होण्यासही नकार दिला होता. करोना संकटाच्या काळात अशा प्रकारे निरोप समारंभ आयोजित करण्यास आपला विवेक परवानगी देत नाही, असं अरुण मिश्रा म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times