नवी दिल्लीः चिनी राजदूत एकीकडे लडाखमधील स्थिती सुधारल्याचा दावा करत असताना दुसरीकडे चिनी सैनिक चिथावण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. चिनी सैनिकांनी फक्त २९ ऑगस्टच्या रात्रीच नव्हे तर ३१ ऑगस्टला सोमवारी पाँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराच्या कडक इशार्‍यानंतर ते परतले. मंगळवारीही चिनी सैनिकांच्या कुरापती सुरूच होत्या. चुमारमध्ये त्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना मागे हटवलं.

चीनी सैन्याने मंगळवारी चुमार भागात प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना सीमेत घुसण्यापासून रोखलं. चिनी सैनिकांच्या घुसखोरीच्या कुरापतींबाबत भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा सुरू असताना त्याचवेळी चिनी सैनिक सतत भारतीय भूभाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

ब्रिगेड कमांडर स्तराच्या सोमवारच्या बैठकीदरम्यानही चिनी सैनिकांच्या कुरापती सुरूच होत्या. भारतीय लष्कारचे जवान ज्या ठिकाणी तैनात आहेत त्या भागात त्यांच्या हालचाली वाढल्या. चिनी सैनिकांच्या हालचाली पाहिल्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांना त्यांच्या हद्दीत परत जाण्याचा कडक इशारा देण्यात आला. तसेच ब्रिगेड कमांडर स्तरावरील बैठकीत कडक भाषेत भारताकडून संदेश देण्यात आला. त्यानंतर चिनी सैनिक आपल्या हद्दीत परतले, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.

‘चिनी सैनिक पुन्हा कुरापती करू शकतात’

चिनी सैनिकांनी २९ ऑगस्टच्या रात्री घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्याला प्रत्युत्तर देऊन बचावात्मक कारवाई करत भारतीय जवान तीन महत्त्वाच्या डोंगरांवर पोहोचले आणि तिथे त्यांनी ताबा मिळवला. भारतीय जवान आता तिथे तैनात आहेत. चीनच्या चिंतेचं कारण हेच आहे. कारण हे तीन डोंगर महत्त्वपूर्ण आहेत आणि येथून चीनच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकतं. चीन त्या भागात आपली स्थिती बळकट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. यातूनच चिनी सैनिकांनी त्या डोंगरांजवळ जाण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक पुन्हा अशा कुरापती करू शकतात अशी सर्व शक्यता आहे. यामुळे भारतीय सैन्यदेखील पूर्णपणे तयार आहे, असं लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

लडाखमध्ये चिनी सैनिकांकडून सुरू असलेल्या चिथावणीखोर प्रकारांबद्दल भारताने लष्करी आणि मुत्सद्दी स्तरावर चीनसमोर उपस्थित केला गेला. आपल्या सैनिकांना नियंत्रित करावं, असं भारताने चीनला सांगतिलं. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही महिती दिली.

दुसरीकडे सैन्याच्या ब्रिगेड कमांडर बैठकीतही कुठलंही एकमत झालं नाही. सोमवारीही ही बैठक झाली होती आणि मंगळवारीही झाली. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या डोंगरावरून भारतीय जवानांना मागे बोलवावं, असं चीनने म्हटलं. तर हा भारताचा भूभाग आहे. चीन एप्रिलमधील स्थिती सीमेवर पूर्ववत करत नाही तोपर्यंत जवान तिथेच राहतील, असं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here