नालासोपाऱ्याच्या आचोळे रोडवर मजिठीया पार्कमध्ये साफल्य नावाची पाच मजली इमारत आहे. ही इमारत ११ वर्षे जुनी असून २००९मध्ये तिची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी या इमारतीला भले मोठे तडे गेले होते. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. तसेच इमारतीत राहणाऱ्या २० फ्लॅटधारकांना इमारत खाली करण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी १५ कुटुंबांनी ही इमारत सोडली होती. या इमारतीत पाच कुटुंबं राहत होते. या कुटुंबात लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह २२ जणांचा समावेश आहे. घराच्या भाड्यावरून बिल्डरविरोधात कायदेशीर लढाई सुरू असल्याने हे कुटुंब येथे राहत आहे.
काल संध्याकाळी या रहिवाश्यांनी इमारतीच्या आवारात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांना इमारतीच्या गेटसमोर चिखल साचलेला दिसला. इमारती अधिकच जर्जर होत असल्याचं पाहून त्यांनी बुधवारी (आज) पालिकेत तक्रार देण्याचा निर्णयही घेतला. रात्री ११ च्या सुमारास इमारतीचा ढिगारा कोसळत असल्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे इमारतीत अडकलेले इतरही लोक तात्काळ घराबाहेर पडले. या सर्वांना इमारतीला अधिकच तडे जात असल्याचं दिसून आलं आणि इमारतीचा काही भाग पडल्याचं आढळून आलं.
दैव बलवत्तर म्हणून…
त्यानंतर त्यांनी इमारतीपासून दूरवर उभं राहून पुढे काय करायचं? याची चर्चा सुरू केली. १ च्या सुमारास सीमा आणि दयानंद देवरुखकर हे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घरात गेले आणि त्यांनी घरातून पैसे आणले. देवरुखकर कुटुंब घरातून पैसे घेऊन इमारतीच्या बाहेर येताच अवघ्या काही मिनिटातच म्हणजे दीड वाजता ही इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. त्यामुळे या दुर्घटनेतून देवरुखकर कुटुंब थोडक्यात बचावले.
या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कुणीही अडकले नसल्याचं अग्निशमन दलाने सांगितलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीत राहणाऱ्यांचा संसार धुळीस मिळाला आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे २० जवान बचावकार्य करत आहेत. या घटनेनंतर हा संपूर्ण परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.