नवी दिल्ली : भारतानं १४ जुलै रोजी चांद्रयान ३ श्रीहरीकोटा येथून चंद्राकडे प्रक्षेपित केलं होतं. भारताचं चांद्रयानं चंद्रावर उतरण्यास सज्ज झालेलं आहे. इस्त्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं चांद्रयान चंद्रावर कधी उतरणार यासंदर्भातील अपडेट दिली आहे. चांद्रयान ३ चंद्रावर २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी उतरणार आहे, अशी माहिती इस्त्रोनं दिली आहे. चांद्रयान ३ सध्या चंद्रापासून २५ किमी अंतरावर आहे. यापूर्वी ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरण्यासाठी ‘डीबूस्टिंग’ची (वेग कमी करण्याची) प्रक्रिया यशस्वीपणे झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रो) जाहीर करण्यात आले होते.‘चांद्रयान ३’ चंद्राच्या कक्षेमध्ये असून, प्रॉपल्शन आणि लँडर मॉड्यूल १७ ऑगस्ट रोजी विलग झाले होते. ‘चांद्रयान-३’चे विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले असून ते २५ किमी अंतरावर आहे.

चांद्रयानाच्या लँडिंगचं प्रक्षेपण कुठं पाहणार?

चांद्रयानाचं लँडिंग २३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्रावर होणार आहे, अशी माहिती इस्त्रोनं दिली आहे. हे लँडिंग इस्त्रोच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

चांद्रयान ३ ची वैशिष्ट्ये

‘चांद्रयान ३’चे प्रक्षेपण १४ जुलै रोजी झाले होते. ‘चांद्रयान ३’ला चंद्राच्या कक्षेत पोचण्यासाठी २२ दिवसांचा कालावधी लागला होता. ‘चांद्रयान ३’चे प्रक्षेपणादरम्यानचे वजन ३९०० किलो होते. यात प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल दोन्हींचा समावेश आहे. ‘चांद्रयान ३’चे प्रक्षेपण लाँच वेहिकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या रॉकेटच्या साह्याने करण्यात आले. ‘एलव्हीएम ३’च्या साह्याने पृथ्वीनजीकच्या कक्षेत सर्वाधिक १० हजार किलो वजनाच्या उपग्रहाला प्रक्षेपित करता येते.

रशियाची मोहीम फसली

दरम्यान, रशियानं ४७ वर्षानंतर पहिल्यांदा चंद्रावर यान पाठवलं होतं. त्या यानाचं नाव लुना-२५ असं होतं. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांच्या यानाचं क्रॅश लँडिंग झालं आहे. त्यामुळं रशियाला मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here