रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांसाठी कोकणात स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी मागणी याआधीदेखील करण्यात आली होती. सध्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत अनुकूलता दाखवले असल्याचे समजते. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रामुळे कोकणचे शैक्षणिक प्रश्न सुटणार नाहीत असे प्रतिपादन कोकण विद्यापीठ कृती समितीचे रमेश कीर यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत कोकण विद्यापीठाचा प्रश्न लवकर सुटावा याकरीता आग्रह धरण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकण विद्यापीठासाठी जमीन व निधीची अडचण येणार नाही असं आश्वासन उदय सामंत यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने अनेक प्रशासकीय कामात गोंधळ निर्माण होत असल्याचा दावा करण्यात येतो. पेपर फुटणे, निकालांना होणारा उशीर, प्राध्यापकांच्या नियुक्तीचा प्रश्न आदी विविध कारणांचा परिणाम कोकणातील महाविद्यालये आणि शैक्षणिक वातावरणवर होतो. गोव्याच्या सीमेवरील दोडामार्ग महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना ५५० किमी अंतर गाठून मुंबईत गाठावी लागत असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे.
कोकणातील रत्नागिरीमधील ४५, सिंधुदुर्गामधील ३८ तसेच दक्षिण रायगडमधील २० अशी मिळून १०३ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत समितीने व्यक्त केले. झाल्यास कोकणातील स्थानिक गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील. यामध्ये समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच मेरिटाईम व रेल्वे तंत्रज्ञानासंबंधी अनेक अभ्यासक्रम सुरु करता येतील असा विश्वास समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. कोकण विद्यापीठातील अभ्यासक्रमाची निवड करताना कोकणी संस्कृतीचा प्राधान्याने विचार करता येईल. कोकणातील या दोन्ही जिल्ह्रात भौगोलिक सलगता तसेच शैक्षणिक प्रश्न समान आहेत. प्रवास, वेळ, खर्च वाचल्याने प्रशासनामध्ये अधिक कार्यक्षमता निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात आला.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृती समितीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, सचिव सौरभ विजय, उपसचिव सतीश तिडके, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, डॉ. धनंजय माने, डॉ. संजय जगताप, रमेश कीर, सदानंद भागवत आदी उपस्थित होते.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines