माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझं संपूर्ण भाषण ऐकलं तर मी पवार साहेबांबद्दल असं काही बोललो नाही. पवार साहेबांनी ४० ते ५० वर्ष आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातील अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या हिमतीवर बहूमत मिळवून सत्तेवर बसतात. परंतु महाराष्ट्रातील जनतेने अशी शक्ति पवार साहेबांच्या सोबत उभी केली नाही, याची मला खंत आहे, आणि ती खंत मी व्यक्त करत होतो. पवार साहेबांना कमी लेखण्याचा किंवा पवार साहेबांना चुकीचं काही बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिले.
दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले?
शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही, असे वक्तव्य दिली वळसे पाटील यांनी केले होते.
जितेंद्र आव्हाडांची वळसे-पाटलांवर टीका
वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले. वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही…पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले. बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी वळसे-पाटील यांना दिला होता.