अशोक हा ट्रकचालक असून त्याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या आईची प्रकृती खालावली आहे. उपचारासाठी वडील सुखदेव यांनी ४५ हजार रुपये जमा केले. महिनाभरापूर्वी अशोक हा पैसे घेऊन पसार झाला. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो घरी आला. यावेळी घरी सुखदेव, त्यांच्या पत्नी, लहान मुलगा राजहंस व मुलगी आरती हे घरी होते. अशोकने दाराची कडी वाजवली. आरती यांनी विचारणा केली. ‘मी अशोक आहे’, असे तो म्हणाला. आरती यांनी दार उघडले व त्याला परत जाण्यास सांगितले. त्यानंतर पहाटे ३ वाजताच्या सुमारास अशोकने पुन्हा दार वाजविले. तो मद्यधुंद अवस्थेत होता. सुखदेव यांनी दार उघडले व त्याला ४५ हजार रुपये परत मागितले.
अशोकने वडील सुखदेव यांना शिवीगाळ सुरू केली. सुखदेव त्याला ढकलत रस्त्यावर घेऊन गेले. अशोक हा सुखदेव यांना मारहाण करायला लागला. सुखदेव यांनी त्याला धक्का दिला. अशोक रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरती व राजहंस घराबाहेर आले. अशोक हा मृतावस्थेत पडलेला त्यांना दिसला. सुखदेव यांनी अशोकचा मृतदेह बाजूला केला व कळमना पोलिस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. अशोकला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून सुखदेवला अटक केली.
‘मी जिवाचे बरेवाईट करेल…’
सुखदेव आणि अशोकमध्ये हाणामारी सुरू असतानाच अशोकच्या आईने मध्यस्थी केली. ‘मारहाण बंद केली नाही तर मी जिवाचे बरेवाईट करेल’, असे म्हणायला लागली. दोघांचा वाद सोडविण्याऐवजी अशोकचा भाऊ राजहंस हा आईची समजूत घालायला लागला. यातच धक्का दिल्याने खाली पडून अशोकचा मृत्यू झाला.