छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेमध्ये बंड झालं तेव्हा जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. यानंतर दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. यामध्ये सर्वात आघाडीवर होते ते पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट.
संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांना थेट अंगावर घेतलं. यामुळे या नेत्यांमध्ये आता कधीच संबंध जुळणार नाहीत, असं कार्यकर्त्यांना वाटत होतं. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमासाठी शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी त्यांची मुलगी हर्षदा शिरसाटही देखील उपस्थित होते. एरवी एकमेकांवर आरोप करणारे नेते वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वतःचे संबंध जोपासत असल्याचं या निमित्ताने समोर आलं आणि यामुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या.
काही दिवसांपूर्वी अजित पवार विरोधी पक्षनेतेपदी असताना महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत महायुतीच्या सत्तेचा सामील झाले. ही घटना ताजी असताना शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी अनेक वेळा अंबादास दानवे हे कधीही आमच्या शिवसेनेमध्ये येतील, असं वक्तव्य अनेक वेळा माध्यमांशी बोलताना केलं होतं. अनेक विरोधी पक्षनेते परिस्थितीनुसार सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतात, याची अनेक उदाहरणं आहेत. अंबादास दानवे यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.