स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे गावातील ध्रुपदाबाई चंदर सारुक्ते या महिलेची प्रेत यात्रा व अंत्यविधी त्यांच्या मुलाने राहत्या घरासमोर केली आहे. अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे मृताच्या कुटुंबाने आपल्या राहत्या घरासमोर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतल. याला जबाबदार ग्रामपंचायत असल्याचे मृताच्या कुटुंबियांनी सांगितले. तसेच प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
इगतपुरी तालुक्याच्या उंबरकोन गावातील ध्रुपदाबाई चंदर सारुक्ते यांचा दि २० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. परंतु स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे अंत्यविधीचा खोळंबा झाला. त्यात पाऊसही सुरू होता. मृतदेहाची अहवेलना काही संपत नव्हती. शेवटी त्या कुटुंबाने अंत्यविधी हा आपल्या राहत्या घरासमोरच केला. घरासमोरच सरण रचत मृतदेहाला अग्नी डाग देण्यात आला. या घटनेने प्रशासना विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, गावातील स्मशानभूमीच्या आजूबाजूला शेती असल्याने शेतकऱ्यांनी तो रस्ता बंद केला आहे. त्यामुळे हा रस्ता प्रशासनाने मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या घटनेनंतर कुटुंबातील लोकांनी व काही गावकऱ्यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना दोषी ठरवत आता तरी रस्ता मोकळा करा असो टाहो केला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा काही प्रमाणात अतिदुर्गम भाग असून या ठिकाणी नागरिकांना मूलभूत गरजांकरिता देखील मोठा संघर्ष करावा लागत आहे.