नागपूर: लॉकडाऊनचा चौथा टप्पा उठवताना राज्य सरकारने राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी दिल्याने आता रेल्वेने मुंबई किंवा पुणे गाठता येईल असे वाटत असेल तर ते मात्र खरे नाही कारण सध्याच्या परिस्थितीत नागपूरवरून पुण्यासाठी एकही गाडी नाही, तर मुंबईसाठी आठवड्यातून फक्त एक गाडी आहे. त्यामुळे नागपुरातील रेल्वे प्रवाशांना या परवानगीचा तसा फारसा उपयोग नाही.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वेने २३ मार्चपासून प्रवाशी रेल्वे सेवा पूर्ण बंद केली होती. मात्र मे महिन्यापासून काही विशेष गड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजवर राज्यांतर्गत प्रवासावर बंदी असल्याने नागपुरातून मुंबईला जायचे असेल तर रेल्वेचे तिकीट मिळू शकत नव्हते. खूपच तातडीचे असल्यास एक तर विमान किंवा मग रेल्वेने नागपूरपासून जवळ असलेल्या पण मध्यप्रदेशात असलेल्या इटारसीला रेल्वेने जायचे व तेथून मुंबईचे तिकीट काढायचे, असा द्रविडी प्राणायाम करावा लागतो. त्यामुळे २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासावरील बंदी उठल्याने राज्यांतर्गत प्रवासाची तिकीट विक्री रेल्वेतर्फे सुरू करण्यात आली. मात्र रेल्वेने अजून नियमित गाड्या सुरू केल्या नसल्याने मुंबई, पुण्याचे तिकीट काढू इच्छिणाऱ्यांच्या पदरी निराशाच आली.

सध्या ज्या विशेष गाड्या धावत आहेत त्यात मुंबईसाठी फक्त हावडा- मुंबई मेल ही एकमेव गाडी आहे व तीही आठवड्यातून एकदाच आहे. आधी ही गाडी दररोज होती मात्र प्रतिसाद नसल्याने जूनमध्ये ती आठवड्यातून एकदा करण्यात आली. त्याचप्रमाणे पुण्यासाठी तर एकही गाडी नाही. त्यामुळे पुण्याला जायचे असल्यास एक तर विमान सेवा किंवा मग एसटीने सुरू केलेल्या शिवशाही बसने जाता येऊ शकते. त्यामुळे रेल्वेच्या राज्यांतर्गत तिकीट विक्री सुरू होण्याचा नागपुरातून पुण्या- मुंबईला जणाऱ्यांना कुठलाही फायदा झाला नसल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here