जयपूर: धावत्या ट्रेनमध्ये एका तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली. २२ वर्षांचा तरुण रामेश्वरममध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. कुटुंबासोबत गेलेला तरुण चित्तोडगढला परतत होता. खजुराहो एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये गेला असताना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. जीआरपी पोलिसांच्या मदतीनं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तरुण एमबीबीएसच्या अभ्यासासाठी पुढच्याच महिन्यात सर्बियाला जाणार होता.चित्तोडगढ जीआरपी ठाण्याचे मुख्य कॉन्स्टेबल सांवर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंथी परिसरात राहणाऱ्या अक्षयचा (२२) ट्रेनमध्ये मृत्यू झाला. चित्तोडगढमधील एक गट रामेश्वरममध्ये सुरू असलेल्या भागवत कथेसाठी गेला होता. कथा आटोपून हा गट चित्तोडगढला परतत होता. या गटात ३० जण होते. त्यात अक्षयचे आई, वडील आणि भावाचा समावेश होता. ही सगळी मंडळी खुजराहो-उदयपूर सिटी एक्स्प्रेसनं चित्तोडगढला परतत होती.सोमवारी पहाटे कुटुंब चित्तोडगढला पोहोचणार होतं. स्टेशन येण्यास अर्धा तास होता. अक्षयच्या कुटुंबानं सामान घेऊन उतरण्याची तयारी सुरू केली. गंगरार स्थानक गेल्यानंतर अक्षय टॉयलेटला गेला. तिकडे त्याची तब्येत बिघडली. तो तिथेच पडला. बराच वेळ होऊनही अक्षय परतला नसल्यानं कुटुंबीय टॉयलेटजवळ पोहोचले.कुटुंबियांनी टॉयलेट बाहेरुन हाका मारल्या. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी ट्रेन चित्तोडगढ जंक्शनला पोहोचली. त्यानंतर याची माहिती कुटुंबानं जीआरपीला दिली. त्यांनी दार तोडलं. आत अक्षय पडलेला दिसला. अक्षयला तातडीनं जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
Home Maharashtra धावत्या ट्रेनमध्ये तरुण लघुशंकेला, खूप वेळ परतलाच नाही; कुटुंबाची टॉयलेटकडे धाव, पाहतात...