मुंबई : मुंबई रेल्वे स्थानकांवरील सरकते जिने तांत्रिक बिघाडामुळे किंवा खोडसाळ प्रवाशांनी आपत्कालीन बटण दाबल्याने बंद पडतात. यामुळे गैरसोय होते. ती दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने अॅप-वेब आधारित यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामुळे सरकते जिने बंद झाल्यास तातडीने त्याची सूचना मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. मध्य रेल्वे स्थानकातील ८० टक्के सरकते जिने आपत्कालीन बटण दाबल्यामुळे बंद पडल्याचे आढळले आहे.

खोडसाळपणे काही प्रवाशांकडून बटण दाबले जाते. जिने बंद झाल्यावर त्याची माहिती मिळणे, रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचणे, जिने सुरू करणे, ही प्रक्रिया वेळखाऊ असते. प्रत्येक सरकत्या जिन्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करणे शक्य नसल्याने मध्य रेल्वेने यांत्रिक पद्धतीने यावर उपाय शोधला आहे. मुंबई विभागाने सरकत्या जिन्यांसाठी वेब आणि मोबाइल अॅपवर आधारित जीएसएम सूचना देखरेख व्यवस्था (अॅलर्ट मॉनिटरिंग सिस्टीम) कार्यान्वित केली आहे.

Thane News: दिवावासी, आता रूळ ओलांडू नका! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…
यंत्रणेच्या मदतीने सर्व सरकते जिन्यांवर मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील नियंत्रकांकडून देखरेख ठेवली जाते. एखाद्या फलाटावरील सरकता जिना बंद पडल्यास त्याची सूचना यंत्रणेच्या माध्यमाने कक्षाला मिळते. मुंबई विभागात ११८ यंत्रणा सर्व सरकत्या जिन्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सरकत्या जिन्यांची नियोजित देखभाल-दुरुस्ती प्रलंबित असल्यास त्याचीही माहिती यंत्रणेमार्फत नियंत्रण कक्षाला मिळणार आहे.

बटणावर जिने होणार सुरू

रेल्वे स्थानकातील फलाटावर बंद पडलेले सरकते जिने मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून कार्यान्वित करण्यासाठी तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रण कक्षातून बंद पडलेले सरकते जिने सुरू करण्यासाठी चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे तंत्रज्ञान रेल्वेच्या सरकत्या जिन्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळे भविष्यात नियंत्रण कक्षामधूनच सरकते जिने सुरू करता येणे शक्य आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Mumbai Ganeshotsav: आरे तलावातील गणपती विसर्जनाचं काय ठरलं? संघर्ष पेटण्याची शक्यता; वाचा सविस्तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here