जिओ फायनान्शिअलचा शेअर्स मंगळवारी बीएसईवर २३९.२० टक्क्यांवर बंद झाला आणि आज २२७.२५ रुपयांवर उघडला. एनएसईवरही शेअर्स पाच टक्क्यांनी खाली २२४.६५ रुपयांवर उघडला. रिलायन्स इंडस्ट्रीजने अलीकडेच आपला आर्थिक व्यवसाय डिमर्ज केला आणि त्याचे नाव बदलून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड असे ठेवले. रिलायन्सच्या भागधारकांना प्रत्येक शेअर्ससाठी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा एक शेअर्स देण्यात आला. दरम्यान, सलग तीन दिवसांच्या घसरणीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये २७ हजार ३०० कोटी रुपयांची घट झाली असून कंपनीचे बाजार भांडवल आता १,४४,३७८.३८ कोटी रुपये झाले आहे.
जिओ फायनान्शिअलचे लिस्टिंग
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे २० जुलै रोजी प्री-लिस्टिंगमध्ये मूल्य २६१.८५ रुपये होते, जे ब्रोकरेज कंपन्यांच्या अंदाजापेक्षा जास्त होते. जिओ फायनान्शिअलचा शेअर्स २१ ऑगस्ट रोजी बीएसईवर २६५ रुपयांवर तर एनएसईवर २६२ रुपयांवर सूचीबद्ध झाला. परंतु संस्थात्मक आणि निष्क्रिय फंडांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे जिओ फायनान्शिअलचा शेअर्स सलग तीन दिवस लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. कंपनीचे शेअर्स २३ ऑगस्ट रोजी निफ्टी आणि सेन्सेक्समधून बाहेर काढले जाणार होते परंतु आता २९ ऑगस्ट रोजी ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी काढले जातील.
बीएसईने एका परिपत्रकात म्हटले की, जिओ फायनान्शिअलचा शेअर्स पुढील दोन दिवस लोअर सर्किटमध्ये अडकला तर काढण्याची तारीख आणखी तीन दिवसांनी हलवली जाईल. तज्ञ म्हणतात की पॅसिव्ह फंड कंपनीचे ९ कोटी शेअर्स विकू शकतात. तर पॅसिव्ह सेन्सेक्स ट्रॅकर्स सुमारे ५.५ कोटी शेअर्स विकू शकतात. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स ०.५२% उसळी घेत २५३२.१५ रुपयांवर व्यवहार करत होता.