रोज तीन किलोमीटर पायपीट करत, अपुऱ्या सुविधा असतानाही प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून लेकीने मिळवलेल्या यशाचे अख्ख्या गावाला कौतुक आहे.
एटापल्ली तालुक्याची अजूनही अतिसंवेदशील नक्षलग्रस्त व मागास अशी ओळख आहे. तालुक्यात शैक्षणिक विशेष सुविधा नसतानाही बिड्री गावातील अश्विनी अशोक दोनारकर या युवतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची कर व मंत्रालयीन सहायक पदी वर्णी लागली आहे.
अंतिम कौशल्य चाचणीत राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात द्वितीय क्रमांक मिळवून तिने यश काबीज केले. २०२१ मध्ये करोना काळात तिने परीक्षेसाठी अर्ज केला होता. ऑगस्ट २०२२ मध्ये परीक्षा झाली. ११ मुलींच्या राखीव पदाकरिता १०७ मुलींनी परीक्षा दिली. यात संगणकासह इंग्रजी कौशल्यात तिने ११९ गुण मिळवत यशावर आपले नाव कोरले.
तिचे वडील सामान्य शेतकरी, तर आई गृहिणी आहे. तिच्या यशाने ते भारावून गेले आहेत. विशेष म्हणजे कुठलीही शिकवणी न लावता पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने अश्विनी दोनारकरचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
अश्विनी दोनारकर हिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या येमली येथील हायस्कूलमधून पूर्ण केले. यासाठी तिला रोज पायपीट करावी लागे, पुढे महाविद्यालयीन शिक्षण तसेच बीएस्सी, बीएड हे पदवीचे शिक्षण तिने गडचिरोलीत शासकीय वसतिगृहात राहून पूर्ण केले.
परिस्थिती कशीही असो पण शासकीय नोकरी मिळवायची ही जिद्द सुरुवातीपासूनच होती. शिक्षक, आई-वडील, बहिणीचे मार्गदर्शन लाभले, त्यामुळे हे यश शक्य झाले. दुर्गम भागातील मुलांनी परिस्थितीमुळे माघार घेऊ नये, तर परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण घेऊन प्रगती साधावी, असे तिने आवाहन केले आहे.