नवी दिल्लीः भारत आणि चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही देशातील सैन्यात ब्रिगेडियर स्तरावर आणखी एक बैठक पार पडली. या बैठकीत सीमेवरील तणाव दूर करण्याबाबत कुठलाही तोडगा निघाला नाही. आता उद्या पुन्हा एक बैठक होण्याची शक्यता आहे. चीनला यावर लवकरात लवकर तोडगा हवा आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

पूर्व लडाख भागातील पँगाँग सरोवराजवळ भारत-चिनी सैनिकांत झालेल्या ताज्या झडपेनंतर मंगळवारी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चुशूल येथे तिसर्‍या फेरीची चर्चा झाली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिगेड कमांडर स्तरीय चर्चा चुशूल येथे झाली.

गेल्या महिन्यात, २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. चिनी सैनिकांचा हा डाव जवानांनी उधळून लावला. यानंतर ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरू करण्यात आली. मंगळवारीही ही बैठक अनेक तास चालली. पण त्याबाबत ठोस काही निघू शकलं नाही. अशावेळी दोन्ही बाजूंकडून आणखी चर्चा करण्याचं ठरवण्यात आलं.

पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर दोन देशांमध्ये ३ वादग्रस्त भाग आहेत. हा चर्चेचा मुद्दा आहे. गेल्या काही दिवसांत चिनी सैनिकांनी ३ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं आणि चिनी सैनिकांचे प्रयत्न उधळून लावले.

चिनी सैनिकांनी घुसखोरीचा पहिला प्रयत्न २९ -३० ऑगस्टला केला. चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय जवानांनी त्यांचा हा घुसखोरीचा डाव उधळला आणि त्यांना माघारी जाण्यास भाग पाडलं.

यानंतर ३१ ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा ब्लॅक टॉपच्या भागात घुण्याचा प्रयत्न केला. पण आता या ठिकणी भारतीय लष्कराचे जवान तैनात आहेत. काल १ सप्टेंबरलाही चिनी सैनिकांनी चुमार भागात पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. पण तिथेही भारतीय जवानांनी त्यांना पिटाळून लावलं.

ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉपच्या जवळील भागात चिनी सैन्य तैनात करण्याबाबतही भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारतीय जवानांनी उंच डोंगरं आपल्या ताब्यात घेतली आहेत. तर या डोंगरांवर भारतीय सैन्याने मागे हटावं अशी चिनी सैन्याने मागणी आहे. दोन्ही देशांमध्ये सोमवारीही पाच तास चर्चा झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here