आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून हे यान सोडण्यात आलं होतं. १४ जुलैपासून ४० दिवसांनतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर सांयकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करेल. यासाठी एलवीएम-३ लाँचरचा वापर करण्यात आलेला आहे.
चांद्रयान लँडिंगच्या लाइव्ह अपडेट्स साठी क्लिक करा
आजचं लँडिंग का?
चंद्रावर १४ दिवसांसाठी दिवस असतो तर पुढच्या १४ दिवसांसाठी रात्र असते. इस्त्रोच्या अंदाजानुसार २३ ऑगस्टपासून चंद्रावर दिवस असणार आहे. म्हणजेच तिथे सूर्योदय झालेला असेल. म्हणजेच चांद्रयानाचं लँडिंग होत असेल त्यावेळी चंद्रावर सूर्यप्रकाश उपलब्ध असेल. म्हणजेच सौर उर्जेचाफायदा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी होणार आहे. चंद्रावर २३ ऑगस्टपासून ५ सप्टेंबर दरम्यान दिवस असल्यानं सौर ऊर्जेवर रोवरचं चार्जिंग होईल.
चांद्रयान-३ साठी किती खर्च आला?
चांद्रयान-३ साठी ६१५ कोटी रुपये खर्च आलेला आहे. २०१९ मधील चांद्रयान-२ अयशस्वी ठरल्यानं ही मोहीम आखण्यात आली होती. चांद्रयान-२ साठी ९७८ कोटी खर्च आला होता.
दक्षिण ध्रुवावर लँडिंग का?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यामागं इस्त्रोचं विशेष धोरण आहे. यातील काही ठिकाणांवर सूर्यप्रकाश देखील पोहोचत नाही. त्या भागातील तापमान-२०० अंश सेल्सिअस पर्यंत जातं. त्यामुळं तिथं बर्फाच्या रुपात पाणी असू शकतं, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चांद्रयान-३ च्या लँडिंगची साइट यावेळी वाढवण्यात आली आहे. ती ४ किमी x २.५ किमी निश्चित करण्यात आली आहे.
सर्वकाही ठीक राहिलं तर भारत हा दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरणार आहे. तर, चंद्रावर सेफ लँडिंग करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीननं हे करुन दाखवलं आहे. अमेरिकेनं ११ वेळा चंद्रावर सेफ लँडिंग म्हणजेच सॉफ्ट लँडिंग केलं आहे. रशिया म्हणजेच सोव्हियत संघानं ८ वेळा सॉफ्ट लँडिंग केलं आहे. चीननं देखील चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे.
चंद्रावर आज सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडर लँड करेल. लँडिंगनंतर लँडर कामाला सुरुवात करेल. त्यानंतर सहा पायांचा प्रज्ञान रोव्हर बाहेर येईल. त्यानंतर इस्रोकडून कमांड दिल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर कार्यान्वित होईल. यानंतर भारताचं राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा अशोकस्तंभ आणि इस्त्रोचे ठसे उमटवले जाणार आहेत.
प्रोपल्शन मॉड्यूल चांद्रयान -३ च्या लँडर आणि रोवरला चंद्रावर सोडून चंद्राच्या १०० किमी कक्षेत कार्यरत राहील. आतापर्यंत गेल्या सात दशकांमध्ये १११ चांद्रमोहिमा विविध देशांकडून करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६६ यशस्वी ठरल्या तर ४१ अपयशी ठरल्या. ८ काही प्रमाणात यशस्वी ठरल्या.