म. टा. प्रतिनिधी, : ‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार होण्यासाठी जिल्ह्यात ९१ रुग्णवाहिकांची व्यवस्था असून, गरज भासल्यास अधिक खासगी रुग्णवाहिका घेण्याच्या सूचना संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत,’ असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. देशमुख यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी सुरू केली आहे. १४ तालुक्यांपैकी आतापर्यंत ११ तालुक्यांची पाहणी करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील आळंदी आणि चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयांबरोबर म्हाळुंगे येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर केंद्राची पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ‌. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, आरोग्य अधिकारी डॉ‌. दीपक मुंढे आदी उपस्थित होते.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरमधील व्यवस्थेची पाहणी करत आहे. सध्या प्रत्येक सेंटरला किमान सहा रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. सेंटरमध्ये रुग्णवाहिकांची सेवा व्यवस्थित मिळेल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ९१ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी काही खासगी रुग्णवाहिका आहेत.’ ‘रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची गरज भासल्यास संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांनी आणखी खासगी रुग्णवाहिका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णवाहिकांअभावी रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचेही निर्देश अधिकाऱ्याना दिले आहेत’ असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

‘कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुणे शहराबरोबर ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. करोनाच्या संकटकाळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सेवाभावी संस्था चांगले काम करत आहेत. या सर्वांची साथ राहिल्यास करोना रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणण्यास मदत होईल’ असेही डॉ. देशमुख म्हणाले.

‘करोनाबाधित रुग्णांवर उपचार करतांना हलगर्जीपणा करू नका. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची करोनाबाधित रुग्ण असेल असे गृहीत धरून करोना चाचणी करा. करोना चाचणीचा अहवाल मिळताच रुग्णांवर उपचार करा’ अशा सूचनाही डॉ. देशमुख यांनी दिल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here