वाचा:
जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलाच्या पोटातील अपेंडिक्स अचानकपणे फुटली होती. अपेंडिक्स फुटून त्याच्या पोटात पू झाला होता. त्यामुळे त्याच्या पोटात खूप दुखत होते. म्हणून मुलाच्या नातेवाईकांनी त्याला जळगाव शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले होते. परंतु करोना संसर्गाची साथ सुरू असल्याने मुलाची करोना तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर मुलाची करोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती. म्हणून त्याला जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी मुलाच्या पोटातील अपेंडिक्स फुटून पू झाल्याचे निदान झाले होते. अशा परिस्थितीत मुलावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा विषय अधिष्ठाता यांच्या कानावर घातला. डॉ. रामानंद यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेचच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
वाचा:
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मारुती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. हेमंत चौधरी, डॉ. उमेश जाधव, भूलतज्ञ डॉ. भारुडे, डॉ. काजल यांनी नर्सिंग स्टाफच्या मदतीने रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. रुग्णाच्या पोटातील फुटलेली अपेंडिक्स, पू तसेच इतर गुंतागुंत दूर करण्यात आली. त्यानंतर त्याला कोविड उपचारासाठी दाखल करण्यात आले. योग्य उपचार मिळाल्याने तो करोना तसेच पोटाच्या त्रासातून पूर्णपणे बरा झाला. या मुलाला आज सायंकाळी कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यावेळी त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सिंग स्टाफचे आभार व्यक्त केले. रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. दरम्यान, रुग्णावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्यानंतर योग्य ते उपचार करण्यात आले. तो पूर्णपणे बरा झाला आहे. कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे तरुणाला जीवनदान मिळाले. या सेवेचे समाधान असल्याची प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times