नवी दिल्लीः फेसबुक द्वेषयुक्त भाषणांवरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी बुधवारी आयटी व्यवहार विषयक संसदीय समितीसमोर हजर झाले. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने फेसबुकच्या प्रतिनिधींना सुनावणीसाठी बोलवलं होतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी ही सुनावणी घेण्यात आली.

संसदेत झालेल्या सुनावणीदरम्यान माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते. संसदीय समितीच्या आयटी अफेयर्सच्या सदस्यांनी फेसबुक अधिकाऱ्याला ९० पेक्षा जास्त प्रश्न विचारले. त्याचबरोबर बैठकीनंतर शशी थरूर यांनी ट्विट केले. साडेतीन तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या संसदीय समितीची बैठक संपली. या प्रकरणी पुन्हा चर्चा करण्यावर आमचं एकमत झालं, असं थरूर यांनी सांगितलं.

या बैठकीत शब्दीक फैरीही झडल्या. आपला कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असं फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी सांगितलं. यावेळी विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. भाजपने अजित मोहन यांच्यासमोर फॅक्ट चेकचा मुद्दा उपस्थित केला. अजित मोहन कॉंग्रेससाठी काम करतात, असा आरोप भाजप सदस्यांनी केला. अजित मोहन यांनी हे आरोप फेटाळून लावले. आपण मॅकिन्सेबरोबर काम केलं आणि केरळमध्ये कॉंग्रेससाठी अहवाल तयार केला. असे अहवाल कोणत्याही पक्षासाठी आपण तयार करून देऊ शकतो, अजित मोहन यांनी सांगितलं.

बैठकीनंतर फेसबुकचे विधान

समितीच्या बैठकीनंतर फेसबुकने एक निवेदन जारी केले आहे. संसदीय समितीने वेळ दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आम्ही एक मुक्त आणि पारदर्शक प्लॅटफॉर्म म्हणून वचनबद्ध आहोत आणि नागरिकांना मुक्तपणे व्यक्त होण्याची परवानगी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं निवेदनात म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here