मुंबई: राज्यातील मंदिरं लवकरच सुरू होणार असून मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेणार असल्याचं शिवसेना नेते कितीही सांगत असले तरी मुख्यमंत्र्यांच्या मनात मात्र काही वेगळंच आहे. मंदिरं आणि धार्मिकस्थळं उघडण्याच्या विनंत्या येत आहेत. मात्र, त्याविषयी सावधानता बाळगावी लागणारच आहे, असं मोघम उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. मंदिरं सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी थेट भाष्य न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून यानिमित्ताने राज्यातील मंदिरं लवकर सुरू होणार नसल्याचे संकेतही मिळत आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी विठ्ठल मंदिराचं आंदोलन केल्यानंतर आठ दिवसात मंदिरं सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं सांगितलं होतं. तर मनसे अध्यक्ष यांनीही मंदिरं सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा आजच ठाकरे सरकारला पत्र लिहून दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंदिरं सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची मनापासूनची इच्छा असून ते लवकरच याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. राऊत यांनी ही प्रतिक्रिया देऊन तासभरही उलटला नाही तोच मुख्यमंत्र्यांनी मंदिरांचा उल्लेख करून त्यावर थेट भाष्य न केल्याने तूर्तास तरी राज्यातील मंदिरं सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले आहेत. मंदिरे व धार्मिकस्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, अशी असं सांगून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य करणं टाळलं. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर येथीळ कोविड उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले…

>> पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई- ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकत असल्याने निश्चितच जबाबदारी वाढवणार आहे

>> पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, अशी मराठीत म्हण आहे. करोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका

>> इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करताहेत. आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊसही सुरू आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे.

>> सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, चेस दी व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या

>> आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहायक यांच्या सहभागाने आपण संपूर्ण राज्यात घरोघरी भेटी देऊन कुटुंबांच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल. यात घरातल्या कुणाला इतरही काही आजार आहेत का? त्यांचे आरोग्य कसे आहे? त्यांना न्युमोनियासदृश्य काही लक्षणे आहेत का? घरात बाहेरून कुणी व्यक्ती आल्या आहेत काय? मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का? याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल.

>> करोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहायाने मोठ्या प्रमाणावर राज्यात जनजागृती करण्याची गरज आहे. कारण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग होता तसाच करोनामुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे.

>> केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या करोना लढ्यात काही अडचणी आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.

>> करोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत.

>> सुविधा उभारण्यात मदत केली जाईल, निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि करोना रोखा.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here