म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: मेट्रो बंद… बस बंद… शाळा-कॉलेजे, सरकारी कचेऱ्या, बाजारपेठा बंद… रस्त्यांवरून जाण्याची मुभा नाही… हे कोण्या लॉकडाउन-२चे वर्णन नाही तर राजधानी दिल्लीत पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या जी-२० शिखर परिषदेसाठीच्या कडक सुरक्षाव्यवस्थेचे नियोजन आहे. प्रगती मैदानाच्या भव्यदिव्य कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या या बैठकीत अमेरिका, चीनच्या प्रमुखांसह अनेक देशांचे जागतिक नेते सहभागी होणार असल्याने विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे किमान ८ ते १० सप्टेंबरपर्यंत दिल्लीतील जवळपास सारे काही बंद राहणार असून, राजधानीला पोलिस छावणीचे स्वरूप येणार आहे.

जी-२० दिल्ली शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख आणि मुत्सद्दी सहभागी होणार आहेत. याशिवाय संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधीही दिल्लीमुक्कामी येत आहेत. या परिषदेचा जोरदार प्रचार करण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. बैठकीनंतर राष्ट्रप्रमुख मायदेशी परततील. मात्र त्यांचे सदस्य व सुरक्षा गटातील हजारो लोकांचे ताफे दिल्ली सोडेपर्यंत जवळपास आठवडाभर राजधानीत कमी-अधिक प्रमाणात वाहतूक निर्बंध राहतील. यामुळे व्यावसायिकांसह विविध वर्गांत एका प्रकारच्या धास्तीचे वातावरण आहे.

डोक्यावर टोपी, गळ्यात तुळशी माळा; वारीच्या रंगात रंगले जी-20 चे सदस्य

जी-२० परिषदेनिमित्त परदेशी राष्ट्रप्रमुखांसह डाव्या ‘स्टीयरिंग सीट’चा सुमारे १५० कारचा ताफाही दिल्लीत उतरेल. प्रत्यक्ष शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबरला होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ८ सप्टेंबरपासूनच संपूर्ण दिल्लीत जागतिक नेत्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार आहे, त्या-त्या रस्त्यांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

रस्त्यारस्त्यावर ‘रूटिंग’

एखाद्या व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी रस्त्यावरून जाताना तो संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जातो. संपूर्ण रस्ता पूर्णपणे रिकामा करून कोणीही व्यक्ती वाहनांचा ताफा जाईल त्या रस्त्यावर दर्शनी भागांत दिसणार नाही याची काळजी घेतली जाते. राष्ट्रपती व पंतप्रधानांची सुरक्षाव्यवस्था (एसपीजी) अनेक वर्षांपासून अनुभवणाऱ्या दिल्लीकरांना ‘रूटिंग’चा बऱ्यापैकी अनुभव आहे. यात आता जी-२०निमित्त दिल्ली-गुडगाव रस्ता पूर्ण बंद राहील व एखाद्या देशाचे प्रमुख दिल्लीतील धौला कुआ येथील ताज पॅलेस हॉटेलमधून निघाले तर तेथून प्रगती मैदानापर्यंत सर्व मार्ग बंद केला जाईल. हीच स्थिती अनेक मार्गांवर राहील, असे सांगण्यात आले.

Mumbai Ganeshotsav: ११ स्थानकांसाठी ३५ तात्पुरते थांबे; एसटीच्या उत्सव विशेष गाड्यांसाठी नियोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here