राज्यातील सर्वांत मोठे येरवडा कारागृह कैद्यांनी तुडुंब भरले आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता २,३२३ असताना प्रत्यक्षात सात हजारांच्या घरात कैदी शिक्षा भोगतात. त्यामुळे दैनंदिन सुविधांसह सुरक्षेवर प्रचंड ताण वाढला आहे. त्यामुळे कारागृह विभागाकडून मागील काही वर्षांपासून राज्यात आणि पुणे जिल्ह्यालगत नवीन कारागृह उभारणीसाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे.
राज्य सरकारने बारामती तालुक्यात नवीन कारागृह उभारणीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याच्या मागे ८९ गुंठे जागेत नवीन कारागृह उभारत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) कामाला सुरुवात केली आहे. दोनशे कैद्यांची क्षमता असणारे कारागृह उभारले जाणार आहे. यात १५० पुरुष आणि ५९ महिला कैद्यांचा समावेश असणार आहे. कारागृह महानिरीक्षक (विशेष) जालिंदर सुपेकर यांनी नुकतीच बारामतीचा दौरा करून कामाचा आढावा घेतला.
बारामती येथील नवीन कारागृहामुळे येरवडा कारागृहावरील वाढत्या कैद्यांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे; शिवाय तालुक्यातील कैद्यांना स्थानिक कोर्टात ने-आण करण्यासाठी लागणारा पोलिस बंदोबस्त आणि वेळ वाचणार आहे. नवीन कारागृहाशेजारी अधिकारी आणि कर्मचारी वसाहत बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.
येरवडा कारागृहात कैद्यांची संख्या तीनपट झाल्याने जिल्ह्यातील बारामती तालुक्यात दोनशे कैद्यांचे नवीन कारागृह बांधले जात आहे. १५० पुरुष आणि ५० महिला कैद्यांची क्षमता आहे. सरकारकडून २५पैकी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या दोन वर्षांत कारागृहाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बारामतीचे नवीन कारागृह कार्यरत झाल्यावर बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील कैदी या कारागृहात ठेवले जातील.
– जालिंदर सुपेकर, कारागृह महानिरीक्षक (विशेष)
असे असणार नवे कारागृह…
– ८९ गुंठे जागेवर उभारणी.
– २०० कैद्यांची क्षमता (पुरुष १५० आणि महिला ५०)
– येत्या दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
– एकूण २५ कोटी निधी मंजूर, त्यापैकी सध्या १५ कोटी मंजूर.
– बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील कैदी ठेवणार.
– त्यामुळे येरवडा कारागृहावरील कैद्यांचा ताण कमी होणार.